
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) -: सौ. विजयमाला पतंगराव कदम प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, विटा येथे विटा पोलीस स्टेशनचे पोलीस मित्र श्री. सिराज शिकलगार यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, शिस्त, कायद्याबाबत आदर आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
मार्गदर्शन करताना श्री. शिकलगार यांनी विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, पोलीस प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे तसेच शालेय जीवनात समोर येणाऱ्या विविध प्रलोभनांपासून दूर राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले. यशस्वी जीवनासाठी शिस्त, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
सध्या विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या मोबाईलच्या अतिवापरामुळे व व्हिडिओ गेमच्या व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक दुष्परिणाम त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी डिजिटल साधनांचा मर्यादित व विधायक वापर करून आपला वेळ अभ्यास, खेळ, वाचन आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी खर्च करावा, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांचा आदर करणे, त्यांच्या आज्ञेचे पालन करणे, शिक्षकांचे मार्गदर्शन मनापासून स्वीकारणे आणि चांगले संस्कार जोपासून चारित्र्यसंपन्न नागरिक बनण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे सिराज शिकलगार यांचे स्वागत इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक तात्यासो शेंडगे यांनी केले. कार्यक्रमास प्रशालेचे कार्यवाहक श्री. योगेश्वर रघुराज मेटकरी, प्राचार्या वैशाली कोळेकर , जयश्री हंबीरे , शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार सागर कचरे यांनी मानले . विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रम उत्स्फूर्तपणे ऐकून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.