दर्पण न्यूज सांगली : सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक २०२६ ची मतमोजणी सोमवार, दि. 22 जून 2026 रोजी होत आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, जिल्ह्यात शांतता रहावी, तसेच जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधीत रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार तरुण भारत स्टेडीयम, एस.टी.स्टँड रोड, सांगली या मतमोजणी केंद्राच्या इमारतीपासून 100 मीटर सभोवतालचे परिसरात, पुढील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.
आदेशात म्हटले आहे की, मतमोजणी केंद्राच्या इमारतीपासून 100 मीटर सभोवतालचे परिसरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटागटाने फिरणे, एकत्रित गटागटाने फिरणे व उभे राहण्यास, झेरॉक्स मशीन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक यांचा वापर करण्यास मनाई केली आहे. तसेच मतमोजणी केंद्रात मोबाईल, पेजर वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
हा आदेश निवडणूक कर्तव्य बजावीत असणाऱ्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना लागू असणार नाही. हा आदेश दि. 22 जून 2026 रोजीचे सकाळी 06:00 वाजल्यापासून ते संबंधित मतमोजणी केंद्रावरील मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात म्हटले आहे.