दर्पण न्यूज मिरज / सांगली : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ची आढावा बैठक पार पडली. विविध कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जून अखेर पाठवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बाळासाहेब कामत, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी उदय पवार तसेच विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 60 टक्के निधी प्राप्त झाला असून विविध यंत्रणांनी त्यांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने द्यावेत. स्पील अंतर्गत असलेली कामे पूर्ण करून निधी मागणीसाठीही प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी निधी वितरीत केला जाईल. ज्या विभागांनी अद्यापही तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवलेले नाहीत, त्यांनी ते त्यांच्या संबंधित विभागांना पाठवून त्यासाठी पाठपुरावा करून तांत्रिक मान्यता महिनाअखेर पर्यंत प्राप्त करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यतेसाठी प्राप्त प्रस्तावांबाबतही आढावा त्यांनी यावेळी घेतला.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी विभागनिहाय मंजूर असलेला निधी, प्रशासकीय मान्यतेसाठी प्राप्त प्रस्ताव, स्पील अंतर्गत असलेली रक्कम व सद्यस्थिती याबाबत सविस्तर सादरीकरण केले. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बाळासाहेब कामत यांनीही अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत सविस्तर सादरीकरण केले.