दर्पण न्यूज मिरज/सांगली : स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले असून, जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणार नाहीत, त्यांना वसतिगृह व स्वाधार या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही. चालू शैक्षणिक वर्षापासून स्वाधार योजनेस थेट अर्ज करता येणार नाही. शासकीय वसतिगृह प्रवेशअंतर्गत शालेय अभ्यासक्रमासाठी 30 जून व 11 वी नंतर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 15 जुलैपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील इ. 11 वी, 12 वी तसेच इ. 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळण्याकरिता अर्ज करुन देखील प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. स्वाधार योजना सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील तसेच हद्दीपासून 5 कि.मी. परिसरातील व तालुक्याच्या ठिकाणी (तालुका नगरपंचायत/नगरपरिषद हद्दीतील) असलेल्या महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थी/विद्यार्थिनींकरिता राबविण्यात येत आहे. वरील अभ्यासक्रमामधील पात्र विद्यार्थ्यांनी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नवीन शासन नियमानुसार स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी आपल्या महाविद्यालयाच्या नजीकच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशाचे ऑनलाईन पोर्टल https://hmasnew.mahait.org वर अर्ज नोंदविणे आवश्यक आहे.
शासकीय समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश मिळण्याकरिता अर्ज करुन देखील गुणवत्तेनुसार अथवा जागा रिक्त नसल्याने विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास सदर विद्यार्थ्यास स्वाधार योजनेचा अर्ज सादर करता येईल. जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणार नाहीत, त्यांना वसतिगृह व स्वाधार या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच चालू शैक्षणिक वर्षापासून स्वाधार योजनेस थेट अर्ज करता येणार नाही. तसेच शिराळा तालुका येथे मुलींचे शासकीय वसतिगृह नसल्याने त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी हा नियम शिथिल करण्यात आला आहे.
याअनुषंगाने, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील पात्र विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावेत. वसतिगृहामध्ये भोजन, निवास, निर्वाह भत्ता, आवश्यक स्टेशनरी इत्यादी सोयी मोफत उपलब्ध असुन गुणवत्तेनुसार अथवा जागा रिक्त नसल्याने विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास त्यास स्वाधार योजनेचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.