दर्पण न्यूज भिलवडी/पलूस, प्रतिनिधी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील वसगडे येथील स्टँड परिसरातील रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिक, वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि खराब झालेली अवस्था यामुळे अपघाताचा धोका वाढला असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित रस्त्याच्या कामाबाबत माहिती घेतली. तसेच रस्त्याच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदाराशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्वरित काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग, पलूस यांनी संबंधित कंत्राटदाराला दिलेल्या लेखी सूचनेत वसगडे कॅनॉल ते तालुका हद्द या मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण तसेच आरसीसी गटर बांधकामाचे काम मंजूर असून ते तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. अलीकडील पावसामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
प्रदीप आप्पा कदम यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर कंत्राटदाराने येत्या गुरुवारपर्यंत रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
यामुळे वसगडे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, अनेक दिवसांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्थानिकांनी प्रदीप आप्पा कदम यांनी केलेल्या तत्पर पाठपुराव्याचे स्वागत करत रस्त्याचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली आहे.