दर्पण न्यूज मिरज /सांगली : सांगली सह सातारा विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 अंतर्गत येत्या 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, मतदानादरम्यान गोपनीयतेचा भंग होणार नाही यासाठी निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी निता सावंत-शिंदे, उपजिल्हाधिकारी रघुनाथ पोटे, विजया यादव, तहसीलदार तसेच मतदान अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
मतदान केंद्रांवर गोपनीयतेला प्राधान्य
प्रशिक्षणावेळी बोलताना डॉ. अमित सैनी यांनी मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचे महत्त्व अधोरेखित केले. मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत जबाबदारीने काम करत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, असे त्यांनी सांगितले. मतदान करताना कोणत्याही मतदाराने छायाचित्र काढू नये किंवा मतदान कक्षात कोणत्याही प्रकारचा कॅमेरा नेला जाणार नाही याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच मतदारांना मतदानाची योग्य पद्धत, वैध आणि अवैध मतदान याबाबत स्पष्ट मार्गदर्शन करण्यात यावे, यासाठी आवश्यक माहिती असलेले फलक मतदान केंद्राच्या दर्शनी भागात लावावेत, असेही त्यांनी सांगितले.
वेबकास्टिंग व्यवस्था सक्षम ठेवा
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि नियंत्रणासाठी सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था सुरळीतपणे कार्यरत राहील याची खात्री करण्याच्या सूचनाही डॉ. सैनी यांनी दिल्या. मतदान केंद्रांवरील सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्यरत राहण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज करा
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनीही उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना मतदान प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि शांततेत पार पडण्यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश दिले. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. मतदान प्रक्रियेबाबतची सर्व माहिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सविस्तर जाणून घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मतदान केंद्रांवरील कामकाज, मतदानाची प्रक्रिया, मतदारांना द्यावयाच्या सूचना आणि इतर आवश्यक बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
अधिकाऱ्यांकडून सविस्तर प्रशिक्षण
प्रशिक्षण कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी रघुनाथ पोटे तसेच उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी निता शिंदे यांनीही मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेतील विविध टप्पे, जबाबदाऱ्या आणि घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर माहिती दिली.
स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रशिक्षणामुळे मतदान प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि सुरळीत पार पडण्यास मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.