

दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार):-
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र आषाढी वारीच्या निमित्ताने भारती विद्यापीठ, पुणे संचलित यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, घोटी बुद्रुक येथे शुक्रवार दि. २४ जुलै रोजी सकाळी ८ वाजता भव्य आषाढी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या अखंड गजरात साकारलेला हा सोहळा अत्यंत भक्तिमय आणि नेत्रदीपक ठरला.
आषाढी वारीच्या पारंपरिक स्वरूपाचे उत्कृष्ट दर्शन घडवत विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात हरिपाठ, विठ्ठलभक्तीपर गीते सादर केली. लेझिम पथक, झांज पथक आणि वारकरी वेशभूषेत साकारलेला पालखी सोहळा यामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. विठ्ठल-रुक्मिणी तसेच वारकरी वेशातील विद्यार्थ्यांनी साकारलेली दृश्ये पाहून उपस्थितांमध्ये भक्तिभाव दाटून आला.
विद्यार्थिनींनी फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला, तर पकवाज व टाळांच्या गजरात विद्यार्थ्यांनी धरलेला ताल सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. तब्बल १५० विद्यार्थ्यांनी सादर केलेले गोल रिंगण हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. या रिंगणातून विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या चरणी आपली सेवा अर्पण केल्याची भावना व्यक्त केली.
दिंडी मार्गावर गावातील भाविक व ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पालखीचे पूजन करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
खानापूर पंचायत समितीचे माजी सदस्य मा. श्री. गणपतराव दादा पाटील तसेच सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. मोहनकाका पाटील (घोटीकर) यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अभूतपूर्वरीत्या साकार झाला.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शालिवान भालचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी, पंचक्रोशीतील मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
