दर्पण न्यूज मिरज / सांगली : डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन सप्ताह दि. 10 ते 16 जून 2026 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकिय रुग्णालय, सांगली येथे डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डॉ. गायत्री वडगांवे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रम प्रसंगी नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे, डॉ. प्रमोद चौधरी, अभिनंदन पाटील व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी डॉ. भालचंद्र यांचा जन्मदिवस व मृत्यु दिवस हा दि. 10 जून असल्याचे सांगून डॉ. भालचंद्र यांनी कोणतेही अद्ययावत साधन नसताना अधिकाधिक मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे काम करून अंधांना दृष्टी देण्याचे काम प्रामाणिकपणे केल्याचे सांगितले. त्याचबरोबर डॉ. भालचंद्र यांनी स्वःताच्या गाडीतून रुग्णांना घेवून मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या असून जिल्हा शल्य चिकित्सक या पदाचा पदभार देखील सांभाळल्याची माहिती दिली.
शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे नेत्र विभागप्रमुख डॉ. शरद शेगांवकर यांनी डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन साजरा केला. यावेळी त्यांनी अंधांना दृष्टी कशी प्राप्त होईल याकडे लक्ष देण्याबाबत सांगितले. मिरज येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नेत्रशल्य चिकित्सक, डॉ. अर्चना कसबे, डॉ. स्वप्नाली बंडगर व वैद्यकिय अधिक्षक डॉ. राठी त्याचबरोबर नेत्रविभागातील सर्व विद्यार्थीवृंद उपस्थित होते.