दर्पण न्यूज कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृह येथे अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून साजरा करण्यात आला .
व्यासपीठावर शक्ती कदम उपजिल्हाधिकारी, लेफ्टनंट कर्नल (नि) विलास सुळकुडे उपाध्यक्ष जिल्हा सैनिक मंडळ कोल्हापूर, डॉ.भीमसेन चवदार निवृत्त प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सुभाष डोंगरे सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,एहतेशाम हावेरी उपाध्यक्ष जन स्मॉल फायनान्स बँक आदी उपस्थित होते. प्रारंभी श्री चवदार यांनी प्रास्ताविकामध्ये 1999 मध्ये झालेल्या कारगिल विजय दिवसाची पार्श्वभूमी सांगितली. यावेळी बोलताना रोहयो उपजिल्हाधिकारी कदम यांनी,कारगिल योध्द्यांचे कार्य व बलिदान भारत देश सदैव लक्षात ठेवेल तसेच हा देश त्यांच्या प्रति सदैव कृतज्ञ राहील असे सांगितले .
याप्रसंगी जन स्मॉल फायनान्स बँकेचे एहतेशाम हावेरी व त्यांच्या टीमतर्फे वीर पत्नी,वीर माता,वीर पिता यांनाबँकेच्यावतीने भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.तत्पूर्वी श्री पवार व श्री कदम यांनी सर्व वीर पत्नी,वीर पिता,वीर माता यांची आस्थेने चौकशी केली तसेच जिल्हा प्रशासन सदैव त्यांच्या सोबत असेल व त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली .
यावेळी जन स्मॉल फायनान्स बँकेच्या CSR मधून 13 लाख रुपये खर्च करून सैनिकी मुलींच्या वसतिगृहात करण्यात आलेल्या कामाचे कौतुक अप्पर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी केले. त्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे एहतेशाम हवेरी यांचा सत्कार श्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री डोंगरे यांनी
कारगिल युद्धामधील 85 दिवसांपैकी आपल्या 78 दिवसांबाबतचे स्वानुभव कथन केले.हे अनुभव ऐकताना अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
याप्रसंगी 02 कारगीलच्या वीर पत्नी श्रीमती सविता अशोक बिरंजे-वैरागवडी ता.गडहिंग्लज व श्रीमती सुनीता मछिंद्र देसाई कोल्हापूर ,या व्यतिरिक्त कारगिल युद्ध व अन्य युद्धात शहीद झालेल्या जिल्ह्यातील 26 वीर पत्नी,वीर माता, वीर पिता ,विविध माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी आणि माजी सैनिक व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सुहास कांबळे,कल्याण संघटक यांनी केले.
