दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) -:
अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी धाराशिव येथे भव्य महाएल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप आणि रुक्मिणीताई लोंढे करणार आहेत.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. राजाभाऊ ओव्हाळ यांनी पत्रकार परिषदेची प्रस्तावना केली. त्यानंतर धनंजय शिंगाडे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करत मोर्चाची भूमिका, उद्दिष्टे आणि विविध मागण्यांबाबत सविस्तर निवेदन केले.
यावेळी नितीन शेरखाने, अनिल हजारे, आनंद पांडागळे, विकास बनसोडे, राजाभाऊ राऊत, भालचंद्र कठारे, बाळासाहेब माने आणि सुनील वाघमारे हे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, जिल्हा धाराशिवचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत मोर्चाचा मार्ग, जिल्हाभर राबविण्यात आलेली जनजागृती मोहीम तसेच अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करण्यासह जातनिहाय जनगणना, विद्यार्थ्यांचे विद्यावेतन थेट बँक खात्यात जमा करणे, सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवू नये, रमाई आवास योजनेचे अनुदान वाढविणे, खाजगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करणे आदी मागण्यांवर सविस्तर भूमिका मांडण्यात आली.
मोर्चा जिजाऊ चौक येथून प्रारंभ होऊन छत्रपती संभाजी महाराज पुतळा, संत गाडगेबाबा महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून, तेथे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप, रुक्मिणीताई लोंढे यांच्यासह अन्य मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
या महाएल्गार मोर्चात अनुसूचित जातीतील सर्व ५९ घटकांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले.
