दर्पण न्यूज मिरज/सांगली : क्लबफुट बद्दल (जन्मजात पाय वाकडे असणे) जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि लवकर उपचार होण्यासाठी सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे दि. 9 जून 2026 रोजी जागतिक क्लबफुट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमास डॉ. विकास रोकडे, डॉ. आदित्य शिंदे, सामाजिक वैद्यकीय अधिक्षक संजय खाडे तसेच अस्थिरोग विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच रुग्ण व पालक उपस्थित होते.
डॉ. इग्नासिओ पोन्सेटी यांनी सुरू केलेल्या पोन्सेटी या पध्दतीचा आज जगभरातील असंख्य रुग्णांवर उपचार करुन मुलांचे जीवन बदलत आहे. जन्मजात पाय वाकडे असणारी मुले ही उपचाराखाली येत असून आवश्यक टप्प्यामधील उपचार पध्दतीने लाभार्थ्यांचे पाय सरळ होवून आयुष्यभराचे दिव्यांगत्व नष्ट होत आहे.
क्युअर इंडिया (CURE INDIA) सामाजिक संस्थेमार्फत बालकांना आवश्यक असणारे सर्व साहित्य साधने मोफत पुरविली जातात. सिव्हिल हॉस्पिटल, सांगली व मिरज, जिल्हा शल्य चिकित्सक सांगली, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आजअखेर 150 बालकांना उपचार व शस्त्रक्रिया यांच्या माध्यमातून यशस्वीरित्या दिव्यांगमुक्त करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार 145 बालकांना विशिष्ट प्रकारचे शुज देखील क्युअर इंडियाकडून मोफत देण्यात आले आहेत.
सिव्हील हॉस्पिटल, सांगली येथील अस्थिविभागप्रमुख डॉ. विकास रोकडे, तसेच डॉ. आदित्य शिंदे यांच्यामार्फत बालकांना मोफत उपचार, शस्त्रक्रिया दिल्या जात असल्याबद्दल जिल्हा शल्य चिकत्सिक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी कौतुक केले.
क्युअर इंडिया मार्फत जिल्हा समन्ययक शितल कांबळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच त्यांचमार्फत जिल्ह्यांतील गरजू लाभार्थ्यांचे समुपदेशन, पाठपुरावा केल्याने पालकांमधून समाधान व्य्क्त करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जेष्ठे नागरिक रघुनाथ कांबळे यांनी केले.
0000000