

दर्पण न्यूज मिरज/सांगली :
जत व पलूस तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या गृह उपयोगी भांडी संच, सुरक्षा साहित्य व अत्यावश्यक संच वितरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित वितरण एजंट “किरण दळवी” यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांना मोफत दिल्या जाणाऱ्या साहित्याचे वितरण मफतलाल कंपनीमार्फत खासगी एजंट किरण दळवी यांच्याकडे सोपविण्यात आले होते. मात्र, संबंधित एजंटकडून मोठ्या प्रमाणावर कामगारांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
जत व पलूस तालुक्यातील शेकडो कामगारांनी मार्च २०२६ मध्ये (१३, १८ व २० मार्च) नियमानुसार ऑनलाइन व्हेरिफिकेशन करून टोकन घेतले. तरीदेखील तब्बल तीन महिने उलटूनही कामगारांना त्यांच्या हक्काचे साहित्य देण्यात आलेले नाही. “आज देतो, उद्या देतो” अशा खोट्या आश्वासनांद्वारे कामगारांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे युनियनकडून सांगण्यात आले.
या प्रकारामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित एजंट व कंत्राटदार यांच्यावर फसवणूक, विश्वासघात, अपहार व संगनमताचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
याबाबत युनियनच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुडे यांची भेट घेऊन सविस्तर तक्रार निवेदन सादर केले. यावेळी येलगुडे यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तात्काळ चौकशी करून आवश्यक ती कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.
युनियनने प्रशासनास खालील मागण्या केल्या आहेत :
प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी
संबंधित एजंट व कंत्राटदारावर BNS अंतर्गत गुन्हा दाखल करावा
कामगारांना तात्काळ साहित्य वितरित करावे
आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करून दोषींवर कारवाई करावी
संपूर्ण वितरण प्रक्रियेचे लेखापरीक्षण करावे
दरम्यान, प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्याच्या शिष्टमंडळात पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, युवा जिल्हाध्यक्ष सुमेध माने, सम्यक विद्यार्थी आंदोलन सांगली जिल्हाध्यक्ष शिवाजी उर्फ पवन वाघमारे, उपाध्यक्ष मोहन साबळे, मनपा क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे, सांगली शहर अध्यक्ष संगाप्पा शिंदे, मिरज शहर अध्यक्ष असलम मुल्ला, कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन, विशाल कांबळे, प्रकाश शिवशरण यांचा समावेश होता. त्यांच्याबरोबर नोंदीत पिडित बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकरणामुळे सांगली जिल्ह्यातील कामगार कल्याण योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.