– 30 जून ते 29 जुलैदरम्यान बीएलओकडून घरभेटी
दर्पण न्यूज मिरज / सांगली, : भारत निवडणूक आयोगाने भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 324 नुसार व लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 च्या कलम 21 अन्वये महाराष्ट्र राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदार यादी तयार करण्यासाठी गणनेचा नमुना फॉर्म भरणार आहेत. सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांतील पात्र मतदारांनी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार असून मतदार यादी तयार करण्याची अर्हता दिनांक 1 ऑक्टोबर 2026 आहे. या तारखेस पात्र असलेल्या मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदार यादीचा प्रारूप मसुदा 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केला जाणार असून प्राप्त दावे व हरकतींवरील निर्णयानंतर 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपले इनुमरेशन फॉर्म (Enumeration Form) भरून ते मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्राथमिक टप्प्यात कोणतेही कागदपत्र जमा करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक
विशेष सखोल पुनरिक्षणासाठी अर्हता दिनांक – 01 ऑक्टोबर 2026, तयारी, प्रशिक्षण व छपाई – 20 जून 2026 ते 29 जून 2026, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यामार्फत घरभेटी – 30 जून 2026 ते 29 जुलै 2026, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण – 29 जुलै 2026 पर्यंत, प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी – 5 ऑगस्ट 2026, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी – 5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026, नोटीस टप्पा / दावे व हरकती निकाली काढणे – 5 ऑगस्ट 2026 ते 3 ऑक्टोबर 2026, अंतिम मतदार यादी प्रसिद्धी – 7 ऑक्टोबर 2026.
यापूर्वी महाराष्ट्र राज्यात मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम हा दिनांक 1 जानेवारी 2002 या अर्हता दिनांकावर राबविण्यात आला होता व अंतिम मतदार यादी दिनांक 3 डिसेंबर 2002 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती.
मतदारांनी सध्याच्या तसेच सन 2002 च्या मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी https://www.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ECINET हे मोबाईल ॲप डाउनलोड करावे. Search Your Name in E-Roll / Voter List या टॅब वर क्लिक करावे.
2,482 बीएलओकडून 25.75 लाख मतदारांची पडताळणी
सांगली जिल्ह्यात ही विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 2,482 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून सुमारे 25,75,566 मतदारांच्या तपशीलाची पडताळणी करण्यात येणार आहे. बीएलओ हे 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती संकलित करतील. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) सहकार्य करणार आहेत.
राजकीय पक्षांनाही आवाहन
भारत निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे मतदार यादीतील दुबार नावे तसेच मृत व्यक्तींची नावे वगळणे आणि नव्याने पात्र मतदारांची नोंदणी करणे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक, सर्वसमावेशक आणि अचूक होण्यास मदत होणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.