“माणूस घडवण्याचे काम शिक्षक करतात “-डॉक्टर मिलिंद जोशी
भिलवडी दि. ९ येथील भिलवडी शिक्षण संस्था भिलवडीचा स्थापना दिन माननीय मिलिंद जोशी -संपादक , विचार भारती ,भारती विद्यापीठ , पुणे . तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक व वक्ते यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून संपन्न करण्यात आला . यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . विश्वास चितळे अध्यक्ष , भिलवडी शिक्षण संस्था , भिलवडी . तसेच संस्थेचे विश्वस्त सर्व संचालक , सचिव , सभासद संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक , ग्रामस्थ उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेचे माजी विद्यार्थी ,संचालक ,सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक संस्थेचे माजी सचिव श्री भु .ना .मगदूम सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
प्रमुख पाहुणे मा . मिलिंद जोशी .आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शिक्षक हे मुलांच्या अंतर्मनाशी जोडलेले असतात त्यामुळे शिक्षकांनी मुलांच्या अंतर्मनाचा वेध घेतला पाहिजे . त्यांचे भाषेवर प्रभुत्व असावे . शिक्षक वर्गात जाताना आनंदी चेहऱ्याने आणि येताना हर्षभरी चेहऱ्याने बाहेर पडले पाहिजे . शिक्षक हा मातीच्या गोळ्याला घडवण्याचं कार्य करत असतो ;त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाहून शिकवले पाहिजे . त्यांचे ज्ञान हे वर्तमान काळाची सुसंगत ज्ञान असले पाहिजे . विद्यार्थ्यांशी भावनिक संवाद साधून तंत्रज्ञान युगात तंत्रज्ञान शिक्षणात हवे पण भावनिकता टाळून चालणार नाही . ज्ञानाची प्रतिष्ठा जपणे ही शिक्षकांची जबाबदार आहे . माणूस घडवण्याचे काम शिक्षकांनी केले आहे; म्हणून शिक्षक हा बहुआयामी असला पाहिजे . एका प्रश्नाचे उत्तर एकच असू शकत नाही त्याला अनेक उत्तर असावीत ,मळलेल्या वाटेवरून जाण्याऐवजी अनेक वाटांचा शोध लावता आला पाहिजे ही मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांनी रुजवली पाहिजे .विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा शोध घेऊन त्या कलागुणांना शिक्षकांनी वाव दिला पाहिजे ;कारण या कलागुणातूनच पुढील एखादा कलाकार लपलेला असतो त्याचाही शोध शिक्षकांना घेता आला पाहिजे .कारण या तरुणातच उद्याचे देशाचे स्वप्न लपलेले म्हणून त्यांच्यावर भौतिक समृद्धी बरोबर पारंपरिक कला , संस्कृती , उत्तम वाचन , प्रयोगशीलता सर्वगुण संपन्नता याचे ज्ञान देता आले पाहिजे .तसेच त्या विद्यार्थ्याला शैक्षणिक गुणवत्तेबरोबर आर्थिक , सामाजिक , राजकीय गोष्टींचे ज्ञान दिले पाहिजे . भावनेपेक्षा आधुनिक गुणवत्ता त्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवली पाहिजे आणि त्याच्या मधले नैराश्य दूर केले पाहिजे . सध्याचे मोबाईलचे जग हे आभासी जग आहे या जगात पासून त्याला दूर ठेवता आले पाहिजे .त्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्याला मुक्त अवकाश देता आला पाहिजे .पुस्तके किडा बनवण्याऐवजी बहुविधता त्याच्यामध्ये रुजवली पाहिजे असे ते म्हणाले .
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. विश्वास चितळे .मनोगत व्यक्त करताना म्हणाले की , शिक्षकांनी चालू केलेल्या संस्था दीर्घ टिकतात .शिक्षक हा समाजाची केंद्रस्थानी आहे मात्र आज हे स्थान शिक्षकांचे ढळताना दिसून येत आहे . या शिक्षण क्षेत्रातला शिक्षकांचा दरारा कमी होत चाललेला आहे . विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल आपुलकी प्रेम , माया , ममता निर्माण झाली पाहिजे . शिक्षकात बदल आपुलकी निर्माण झाली पाहिजे . असे ते म्हणाले
यावेळी या कार्यक्रमाचे औचित्य साधून नवनाथ गोरे यांची फेसाटी कादंबरी अखिल भारतीय साहित्य अकादमी पुरस्कार विजेती ठरल्याबद्दल त्यांचा सत्कार करणेत आला . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शरद जाधव यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्रा सौ. एम.बी पाटील मॅडमनी करून दिला . संस्थेचा परिचय संस्था सचिव मानसिंग हाके यांनी करून दिला . शेवटी आभार प्रा. डॉ. महेश पाटील यांनी मानले . या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , विश्वस्त , संचालक , सभासद , शिक्षक व शिक्षकेतर सेवक , ग्रामस्थ उपस्थित होते .