सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक २०२६
दर्पण न्यूज मिरज / सांगली : सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या अनुषंगाने सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील निवडणूकविषयक प्रस्तावित जाहिरातींचे पूर्वप्रमाणन करणे बंधनकारक आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. मैनाक घोष यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 24 ऑगस्ट 2023 च्या पत्रानुसार जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ व्दिवार्षिक निवडणूक-2026 निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांना समान संधी मिळण्याकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील निवडणूकविषयक सर्व प्रस्तावित जाहिरातीचे पूर्वप्रमाणन करणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यूट्युब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खाजगी एफएम वाहिन्या, सिनेमागृहे, सार्वजनिक ठिकाणचे दृकश्राव्य फलक, (ऑडिओ व्हिज्युअल डिस्प्ले), ई वृत्तपत्रे, बल्क एसएमएस किंवा व्हॉईस एसएमएस, समाजमाध्यमे, संकेतस्थळे इत्यादि प्रकारच्या सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातींचे प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. तरी उमेदवारांनी सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातींचे पूर्वप्रमाणन केल्यानंतरच जाहिरात प्रसारित करावी. जाहिरातीच्या प्रमाणिकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज व अन्य अनुषंगिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली येथे संपर्क साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.