दर्पण न्यूज मिरज/सांगली : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक २०२६ साठी सांगली जिल्ह्यातील ५ मतदान केंद्रांची अंतिम यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जाहीर केली आहे.
मतदान केंद्राचे ठिकाण, ज्या इमारतीत मतदान केंद्र असेल ती इमारत आणि ज्या स्थानिक प्राधिकारीचे मतदार मतदान करण्यास पात्र आहेत, त्या प्राधिकारीचे नाव यांची अनुक्रमे यादी पुढीलप्रमाणे –
१) कडेगाव मतदान केंद्र – ठिकाण : तहसील कार्यालय, कडेगाव, पात्र मतदार – कडेगाव नगरपंचायत, कडेगाव व पलूस नगरपरिषद, पलूस.
२) विटा मतदान केंद्र – ठिकाण : उपविभागीय अधिकारी, खानापूर भाग, विटा यांचे कार्यालय, पात्र मतदार – विटा नगरपरिषद, विटा, खानापूर नगरपंचायत, खानापूर, आटपाडी नगरपंचायत, आटपाडी, तासगाव नगरपरिषद, तासगाव.
३) ईश्वरपूर मतदान केंद्र – ठिकाण : तहसील कार्यालय, वाळवा, ईश्वरपूर, पात्र मतदार – उरूण ईश्वरपूर नगरपरिषद उरूण ईश्वरपूर, आष्टा नगरपरिषद, आष्टा, शिराळा नगरपंचायत, शिराळा.
४) सांगली मतदान केंद्र – ठिकाण : अपर तहसील कार्यालय, सांगली, जुना पुरवठा विभाग, राजवाडा, सांगली, पात्र मतदार – जिल्हा परिषद, सांगली, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका.
५) जत मतदान केंद्र – ठिकाण : तहसील कार्यालय, जत, पात्र मतदार – जत नगरपरिषद, जत, कवठेमहांकाळ नगरपंचायत, कवठेमहांकाळ.
या मतदान केंद्रांवर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचे पात्र मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
मतदारांसाठी महत्त्वाच्या सूचना
निवडणूक अधिकाऱ्यांकडून पुरविण्यात येणाऱ्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर मतदानासाठी करावा. इतर कोणतेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईंट पेन किंवा अन्य लेखनसाहित्य मतदानासाठी वापरू नये.
मतपत्रिकेवरील उमेदवारांच्या नावासमोरील ‘पसंतीक्रम’ स्तंभात मतदाराने प्रथम पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर ‘१’ असा अंक लिहून मतदान करावे. एकापेक्षा अधिक उमेदवारांची निवड करावयाची असली तरीदेखील १ हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर घालावा. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या लक्षात न घेता जेवढे उमेदवार निवडणूक लढवत असतील, तेवढे पसंतीक्रम देता येतील. उर्वरित उमेदवारांबाबतचा पुढील पसंतीक्रम अशा उमेदवारांच्या नावासमोर असलेल्या पसंतीक्रम स्तंभामध्ये पसंतीनुसार २, ३, ४ इत्यादि आकडे घालून दर्शवायचे आहेत. कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर फक्त एकच आकडा घातला आहे, याची खात्री करावी. तसेच तोच आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातला नाही, याचीही खात्री करावी. पसंतीक्रम फक्त १, २, ३ अशा आकड्यांमध्येच नमूद करावा. भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपातील अंकांचा वापर करता येईल. मात्र उमेदवाराच्या नावासमोर टिकमार्क (✓), क्रॉस (✗) किंवा इतर कोणतीही खूण केल्यास मतपत्रिका बाद होईल. तसेच मतदाराने मतपत्रिकेवर आपले नाव, स्वाक्षरी, आद्याक्षरे, अन्य शब्द, अंगठ्याचा ठसा किंवा इतर कोणतीही ओळख दर्शविणारी खूण करू नये.
मतपत्रिका वैध राहण्यासाठी किमान एका उमेदवारासमोर ‘१’ हा अंक लिहून पहिली पसंती नोंदविणे आवश्यक आहे. पुढील पसंतीक्रम देणे ऐच्छिक आहे. तरी सर्व पात्र मतदारांनी मतदान प्रक्रियेतील नियमांचे पालन करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.