दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
धाराशीव जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोहीम तीव्र केली आहे. मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज, दिनांक ०८ जून २०२६ रोजी लातूर-ढोकी रोडवरील अळणी येथे ‘दर्शन बियर बार आणि परमिट रूम’च्या आडोशाने अवैध रित्या चालविण्यात येत असलेल्या तीन पत्ती (तिरट) क्लबवर छापेमारीची धडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.प्रवीण सोमवंशी , श्री. सुरेश कासुळे, पोलीस उपनि. श्री. रामचंद्र बहुरे, क्यू.आर.टी. (QRT) व आर.सी.पी. (RCP) अंमलदार आणि चालकांच्या पथकाने सहभाग घेतला.
गोपनीय माहितीच्या आधारे धाड
परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे ही योजनाबद्ध कारवाई करण्यात आली. संबंधित बियर बार आणि परमिट रूम येथे पैशांच्या बदल्यात कॉईन्स देऊन त्या माध्यमातून जुगार खेळवला जात होता. सदर जुगाराचे ठिकाण बारचा मागे चहूबाजूंनी शेताने वेढलेले असल्याने सहजासहजी नजरेस पडत नव्हते. परंतु, पोलिसांची छापेमारी इतकी नियोजनबद्ध होती की, संशयितांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही.
सदर कारवाईदरम्यान घटनास्थळावरून एकूण १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, बार मालक श्रीपाद नारायण वीर याच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७’ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयितांकडून जुगाराच्या साहित्यासह(पत्ते ,कॉइन)मोबाईल,२ चारचाकी वाहने, ४ दुचाकी वाहने व इतर मुद्देमाल, असा एकूण रु. २१,९०,३०५/- (अक्षरी: एकवीस लाख नव्वद हजार तीनशे पाच रुपये फक्त) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.