दर्पण न्यूज मिरज सांगली –: महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सांगली व कृषि विज्ञान केंद्र, कांचनपूर यांच्यामार्फत तानंग (ता. मिरज) तसेच, मौजे वाघोली (ता. कवठेमहांकाळ) येथे “खेत बचाव अभियान” अंतर्गत संभाव्य एल निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्याबाबत आवाहन करण्यात आले.
कृषी विज्ञान केंद्र कांचनपूर येथील शास्त्रज्ञ डॉ. सचिन कोल्हे म्हणाले, एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी होणे, पावसात खंड पडणे किंवा अनियमित पर्जन्यमान होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या व दुष्काळ सहनशील वाणांची निवड करावी. पावसाच्या पाण्याचे संधारण करावे. तसेच, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादन (मल्चिंग), सेंद्रिय खतांचा वापर यावर भर देण्याचे आवाहन करून त्यांनी नैसर्गिक शेती अंतर्गत जीवामृत, बीजामृत, घनजीवामृत, आच्छादन आणि वाफसा या तत्त्वांचा अवलंब केल्यास कमी पाण्यातही पिकांची वाढ चांगली होऊ शकते. त्यामुळे बदलत्या हवामान परिस्थितीत नैसर्गिक शेती हा शाश्वत पर्याय ठरू शकतो, असे नमूद केले.
तानंगच्या कार्यक्रमात तालुका कृषि अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
तानंग येथील कार्यक्रमात मिरजचे तालुका कृषि अधिकारी मिलिंद निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे योग्य वाचन व त्यानुसार खत व्यवस्थापन करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, मृदा आरोग्य पत्रिकेतील विविध घटकांची माहिती देऊन त्याचा पीक उत्पादन वाढीसाठी कसा उपयोग होतो, याबाबत सविस्तर माहिती दिली. मृदा आरोग्य पत्रिकेमध्ये नमूद केलेले सामू, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता याबाबत माहिती दिली. तसेच जमिनीच्या तपासणी अहवालानुसारच खतांचा वापर केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
मंडळ कृषि अधिकारी आत्माराम पवार यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. तानंग गावचे सहाय्यक कृषि अधिकारी सचिन पवार यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया, तसेच हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक वैभव यादव यांनी आत्मा योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमास तानंग गावातील महिला शेतकरी तसेच पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मौजे वाघोलीत मार्गदर्शनासह शेतकऱ्यांचे शंका निरसन
मौजे वाघोली येथे मंडळ कृषि अधिकारी आर. एम. जगताप, ब्लॉक बीटीएम महादेव माळी, अमोल माळी तसेच सहाय्यक कृषि अधिकारी श्रीमती शीतल शेळके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामध्ये एल निनो परिस्थितीमध्ये पीक व्यवस्था, संतुलित खतांचा वापर, उगवण क्षमता वाढविण्यासाठी बीज प्रक्रिया, उगवण व्यवस्थापन तसेच सेंद्रिय निविष्ठा निर्मिती या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी वाघोलीच्या सरपंच श्रीमती साधना शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी विविध विषयांवर प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.