दर्पण न्यूज मिरज/सांगली : अप्पर तहसील कार्यालय, सांगलीच्या कार्यक्षेत्रातील ६ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांची प्रभागनिहाय आरक्षण सोडत शुक्रवार, दिनांक १२ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजल्यापासून संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाहीर विशेष ग्रामसभेत काढण्यात येणार आहे. तरी अंकली, इनामधामणी, जुनी धामणी, तुंग, कर्नाळ आणि कवठेपिरान या ६ संबंधित गावांतील सर्व ग्रामस्थांनी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन सांगलीच्या अप्पर तहसीलदार अश्विनी वरूटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, मा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचेकडील पत्रान्वये राज्यातील बिगर व अंशतः अनुसुचित क्षेत्रातील सन 2024 व 2025 मध्ये मुदत संपलेल्या व सन 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार सार्वत्रिक निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अप्पर तहसील कार्यालय, सांगलीच्या कार्यक्षेत्रातील अंकली, इनामधामणी, जुनी धामणी, तुंग, कर्नाळ आणि कवठेपिरान या ६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. शुक्रवार, दि. १२ जून रोजी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये होणाऱ्या या सोडतीची वेळ पुढीलप्रमाणे – अंकली – सकाळी १० ते १२, इनामधामणी – सकाळी १२.३० ते २.३०, जुनी धामणी – दुपारी ३. ३० ते ५.३०, तुंग – सकाळी ११ ते १२.३०, कर्नाळ – दुपारी १ ते २.३० आणि कवठेपिरान – सकाळी ११ ते १२.३०.