


दर्पण न्यूज भिलवडी पलूस प्रतिनिधी :- सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम साधत पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. धोंडीराम प्रताप शिंदे (आण्णा) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर शुक्रवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिरात युवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल ६० युनिट रक्तदान केले.
पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्टेडियम हॉलमध्ये सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे तसेच रक्तदानाबाबत समाजात जनजागृती व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
शिबिराचे उद्घाटन स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष श्री. प्रदीप आप्पा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमित पाटील (येळावी), संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश पुदाले (आप्पा), उपाध्यक्ष श्री. संदेश कुलकर्णी साहेब व सर्व संचालक मंडळ तसेच संकुलातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर सेवक,माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य,परिसरातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रक्तदानासाठी विशेषतः तरुणाईने दाखविलेला उत्साह सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच भविष्यात गरज पडल्यास रक्त उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आयोजकांकडून देण्यात आले.
यावेळी रक्तदात्यांना आंब्याचे झाड, स्मार्ट वॉच, पाण्याची बॉटल, जेवणाचा डबा तसेच विविध उपयुक्त साहित्य भेट देण्यात आले. “एकीकडे रक्तदानातून जीवन वाचविण्याचा संदेश आणि दुसरीकडे वृक्षलागवडीद्वारे पर्यावरण संवर्धन” असा दुहेरी सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
विशेष म्हणजे, रक्तदात्यांना देण्यात आलेले आंब्याचे झाड हे केवळ भेटवस्तू नसून “माणूस आणि निसर्ग यांचे अतूट नाते जपण्याचा” संदेश देणारे प्रतीक ठरले. झाड लावा, झाड जगवा आणि समाजासाठी जगा हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.
यावेळी बोलताना प्रदीप आप्पा कदम म्हणाले, “धोंडीराम शिंदे यांनी शिक्षणासोबतच सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले आहे. संस्थेमार्फत राबविण्यात येणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहेत.”
अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूती तसेच गंभीर आजारांमध्ये रक्ताची गरज भासत असताना रक्तदात्यांनी केलेले रक्तदान अनेकांसाठी जीवनदायी ठरत असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत समाजसेवा, पर्यावरणप्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेले हे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले.