दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
कोल्हापुरातील थोरला दवाखाना म्हणून ओळख असलेल्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर) येथे कोट्यवधी रुपये खर्चून सुरू असलेल्या विकास कामांमुळे रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलत आहे. गेल्या दोन वर्षांपासून विविध विकासकामे, अत्याधुनिक सुविधा, नवीन इमारती आणि यंत्रसामग्री उभारणीची कामे युद्धपातळीवर सुरू असून त्याचे लोकार्पण व शुभारंभ कार्यक्रम आज सायंकाळी होणार आहे मात्र या कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा फोटो नसल्याने आबिटकर समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
सीपीआर रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे शासकीय रुग्णालय मानले जाते. या रुग्णालयात सुरू असलेल्या विकासकामांसाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री म्हणून प्रकाशराव आबिटकर यांनी देखील विविध बैठका घेऊन कामांना गती दिल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. त्यामुळे जाहिरातीमध्ये त्यांना स्थान न दिल्याने आबिटकर गटाने नाराजी व्यक्त केली आहे.
राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा रंगली आहे. आगामी काळात या विषयावरून दोन्ही गटांमध्ये राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सीपीआरमधील विकासकामांचे श्रेय घेण्यावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, येणाऱ्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त होत आहे.