
दर्पण न्यूज पलूस:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील बुर्ली येथील बौद्ध समाजाला गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युवक आघाडी, पलूस तालुक्याच्या वतीने पंचायत समिती पलूस कार्यालयासमोर ‘अंघोळ आंदोलन’ करण्यात आले. प्रशासनाने वारंवार निवेदने देऊनही पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी न लावल्याने संतप्त कार्यकर्ते आणि नागरिकांनी हे आंदोलन छेडले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीचे अध्यक्ष अविनाश काळीबाग यांच्या नेतृत्वाखाली
उपाध्यक्ष यश आयवळे,प्रणय शिखरे अमोल धाईंजे,गौरव शिखरे,यश शिखरे, अदित्य होवाळ, तुषार शिखरे,प्रतिक शिखरे,सिद्धांत शिखरे,बाळू होवाळ,सुरेश शिखरे तसेच बुरली ग्रामस्थांनी पलूस पंचायत समिती मुख्य द्वारा जवळ साबण शाम्पू लावून सामूहिक आंघोळ आंदोलन केले.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत बुर्ली येथील बौद्ध वसाहतीला तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, बुर्ली येथील बौद्ध समाजातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून महिलांना व नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक वेळा संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंदोलनकर्त्यांनी संबंधित पाणी योजनेचे काम तातडीने पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा तसेच कामातील दिरंगाईस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. अन्यथा येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.