दर्पण न्यूज सांगली : देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या NEET परीक्षेत उघड झालेल्या कथित पेपरफुटी, गुणांमधील संशयास्पद फेरफार आणि परीक्षा प्रक्रियेतील गंभीर भ्रष्टाचाराविरोधात सांगलीत संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे.
वंचित बहुजन आघाडी संचलित सम्यक विद्यार्थी आंदोलन, महाराष्ट्र राज्य (सांगली जिल्हा) तसेच वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निषेध नोंदवत निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी सांगली यांच्या मार्फत, केंद्रीय शिक्षण मंत्री,
भारत सरकार तसेच
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, भारत सरकार,
संचालक, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA), आणि महामहीम राष्ट्रपती भारत सरकार, मा. राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे.
शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह
NEET सारख्या देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा निर्णायक टप्पा असलेल्या परीक्षेतच गैरप्रकार उघड झाल्याने संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास हादरला आहे.
परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर फिरल्याच्या घटना
केंद्रनिहाय संशयास्पद निकाल
उत्तरतालिकेनंतर अचानक पेपरफुटीची कबुली
पुनर्परीक्षेचा मुद्दा
हे सर्व प्रकार योगायोग नसून एक संगनमताने चालवलेली भ्रष्ट साखळी असल्याचा थेट आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
“हुशार विद्यार्थ्यांवरच संशय का?”
विशेषतः ग्रामीण, बहुजन व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवल्यानंतरच पेपरफुटीचा मुद्दा पुढे येणे, हा प्रकार संशयास्पद असल्याचे नमूद करण्यात आले.
“मेहनती विद्यार्थ्यांच्या यशावर पाणी फेरण्याचा हा प्रयत्न आहे का?”
“व्यवस्थेतील अपयश लपवण्यासाठी विद्यार्थ्यांनाच आरोपी ठरवले जात आहे का?”
अशा सवालांनी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले.
विद्यार्थ्यांच्या मानसिक छळावर संताप
रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात ढकलले जात असल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
“विद्यार्थ्यांच्या मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण?”
“त्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना संरक्षण का?”
अशा कडक शब्दांत प्रशासनावर निशाणा साधण्यात आला.
प्रमुख मागण्या (सणसणीत भूमिका)
सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष न्यायालयीन चौकशी
पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींना तात्काळ अटक
संबंधित अधिकारी व जबाबदारांवर कठोर कारवाई
विद्यार्थ्यांच्या नुकसानीची आर्थिक भरपाई
पुनर्परीक्षेबाबत विद्यार्थ्यांचे मत विचारात घेणे
National Testing Agency (NTA) ची पुनर्रचना किंवा विसर्जन करून स्वतंत्र पारदर्शक परीक्षा प्राधिकरण स्थापन करणे
कायदेशीर कारवाईची मागणी
सदर प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फसवणूक, कटकारस्थान, भ्रष्टाचार, कर्तव्यातील निष्काळजीपणा व विद्यार्थ्यांच्या मानसिक छळास कारणीभूत असलेल्या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनाचा इशारा
“ही केवळ सुरुवात आहे…!”
तात्काळ कारवाई न झाल्यास राज्यभर
रास्ता रोको
धरणे आंदोलन
विद्यार्थी मोर्चे
व्यापक लोकशाही संघर्ष
उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
उपस्थित मान्यवर
या आंदोलनात
शिवाजी उर्फ पवन रमेश वाघमारे (जिल्हाध्यक्ष), ऋषिकेश माने (जिल्हानिरीक्षक), रवी मोरे (महासचिव), संजय संपत कांबळे (जिल्हाध्यक्ष), संजय भूपाल कांबळे (जिल्हा संपर्क प्रमुख), प्रशांत संगाप्पा वाघमारे (प. महाराष्ट्र महासचिव), हिरामन भगत (कोषाध्यक्ष), मोहन साबळे, विनायक मोरे (शहर अध्यक्ष), सचिन कोलप, मधुकर (बापू) शेस्वरे, रोहित कांबळे, आकाश कांबळे आदी उपस्थित होते.
“विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राख करणाऱ्या व्यवस्थेला आम्ही माफ करणार नाही.
सत्य बाहेर येईपर्यंत आणि दोषींना शिक्षा होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील!”
अशी ठाम भूमिका घेण्यात आली.