– एल निनोच्या संभाव्य परिणामांवर जिल्हा प्रशासन सतर्क
– प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत घेतली आढावा बैठक
– जलस्त्रोत दुरूस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना
दर्पण न्यूज मिरज/सांगली, : एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक प्रतिबंधात्मक व आपत्कालिन उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात. यंत्रणांनी सतर्क राहून उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे. पाणीसाठे दुरूस्तीची कामे तातडीने करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.
एल निनोचा प्रभाव व त्याबाबत करावयाच्या उपाययोजना याबाबत आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे प्रत्यक्ष तर सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे दृरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच, पाटबंधारे विभाग, लघुपाटबंधारे, पाणीपुरवठा, रोजगार हमी विभाग, जलसंधारण, कृषि, पशुसंवर्धन, अन्न व नागरी पुरवठा आदि संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष तसेच जिल्ह्यातील महसूल उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
सर्व विभागांनी समन्वयाने काम करून संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देऊन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, पाटबंधारे विभागाने उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे. त्यांनी महसूल, ग्रामविकास विभाग व पाणीपुरवठा विभागाशी समन्वय ठेवून पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवू नये यासाठी उपलब्ध जलस्रोतांचे वेळीच नियोजन करावे. जलस्त्रोतातील पाणीनमुने वेळोवेळी तपासावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जिल्ह्यात आवश्यकतेप्रमाणे बंधारे, पाणीसाठवण तलाव आदि जलस्त्रोतांच्या दुरूस्तीची कामे तसेच जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गतची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत. जलसंधारण विभागाने नाला खोलीकरणाची कामे प्राधान्याने करावीत. आवश्यकतेप्रमाणे पाझर तलाव तसेच उपलब्ध जलस्त्रोतातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची कार्यवाही करावी. विहिरी अधिग्रहीत कराव्यात. याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. तसेच, पाणीसाठे नियोजनाचा आराखडा तयार करावा. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात. महसूल, कृषि, पशुसंवर्धन, आरोग्य, ग्रामविकास, जलसंपदा, नगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांनी आपल्या स्तरावर टंचाई कृती आराखडे तयार ठेवावेत, असे त्यांनी सूचित केले.
बैठकीत हवामानातील बदल, पर्जन्यमानातील संभाव्य तफावत, उष्णतेची लाट, पाणीटंचाई, शेतीवरील परिणाम, जिल्ह्यातील जलस्त्रोतातील तसेच धरणातील उपलब्ध पाणीसाठा, सिंचनासाठी आवश्यक पाणी, संभाव्य टंचाई परिस्थितीत आवश्यक पिण्याच्या पाण्याचे नियोजन, चारा, बियाणे आणि खतसाठा, धान्यसाठा आदिंसह टंचाईच्या दृष्टीने आवश्यक तयारीचा आढावा घेऊन सूचना करण्यात आल्या. ग्रामपंचायत व नगरपालिका स्तरावर पाणीबचतीसाठी जनजागृती मोहीम राबवावी. नागरिकांमध्ये अफवा पसरू नयेत यासाठी अधिकृत माहिती प्रसारित करावी. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी यावेळी दिले.
बैठकीत पाटबंधारे विभागाने कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा, उपसा सिंचन योजनांचे आवर्तन, पाणीसाठे आरक्षण आदिंची माहिती दिली. तसेच, पाणीपुरवठा, महानगरपालिका, जलसंधारण, पशुसंवर्धन, कृषि आदि विभागांनी अनुषंगिक माहिती दिली.