दर्पण न्यूज मिरज /सांगली : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील आणखी तेरा रुग्णालयांच्या समावेशाबाबतचा प्रस्ताव शासनाला मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे समन्वयक सुभाष नांगरे, समितीचे सदस्य रंगनाथ शिंपुगडे यांच्यासह रूग्णालयांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सध्या 184 रुग्णालये कार्यरत आहेत. यामध्ये 16 शासकीय, 87 खाजगी, 70 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 11 शहरी आरोग्य केंद्रे, 121 उपकेंद्रे यांचा समावेश आहे. शासनास पाठवलेला प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर यामध्ये आणखी 13 खाजगी रूग्णालयांचा समावेश होणार आहे.
या बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील आणखी 13 रूग्णालयांच्या समावेशाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. रूग्णालयात उपलब्ध असणारे डॉक्टर्स, सोयीसुविधा , बेडची संख्या याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये गाडवे हॉस्पिटल, तासगाव, मिरजकर आय हॉस्पिटल, आष्टा, यादव ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, शिराळा, सूर्या हॉस्पिटल, भिवघाट, स्वस्तिक हॉस्पिटल, मिरज, बेबी हॉस्पिटल, मिरज, अंकुर हॉस्पिटल, ईश्वरपूर, डॉ. घट्टे युरॉलॉजी हॉस्पिटल, मिरज, दाते हॉस्पिटल, कोयना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरपूर, वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट ऑफ योगा, सांगली आणि अपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरपूर या रूग्णालयांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये अंगिकृत करण्याबाबत माहिती देण्यात आली.
————-

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतला
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कार्यवाहीचा आढावा
दर्पण न्यूज मिरज/सांगली : राज्यस्तरीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2026-27 च्या प्रस्तावांना जूनपूर्वी प्रशासकीय मान्यता घेण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या. जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण बाळासाहेब कामत यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीची सभा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, 13 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर ही आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत व त्यावरील कार्यवाहीच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला.
यावेळी गत आर्थिक वर्षातील आहरित निधी संबंधित यंत्रणांनी विहित वेळेत खर्च करण्याची कार्यवाही करावी. आवश्यकतेनुसार निधी मागणी वेळेत करावी. मंजूर कामे वेळेत पूर्ण करावीत. आयपास प्रणालीवर कामांची माहिती अद्ययावत करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिल्या. जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत, तर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण बाळासाहेब कामत यांनी अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रातील योजना) याबाबतची माहिती सादर केली.