
दर्पण न्यूज पलूस -: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अंकलखोप आणि नागठाणे येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मा. प्रदीप (आप्पा) कदम (अध्यक्ष, स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती) यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
*अंकलखोप: अस्थींचे दर्शन आणि महानाट्य*
बाबासाहेबांच्या अस्थी असलेले आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकलखोप या भूमीत मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता पुष्पार्पण व अभिवादन कार्यक्रम होणार आहे. जयंती महोत्सव समितीच्या वतीने पंचक्रोशीतील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, सायंकाळी ७:०० वाजता फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच प्रस्तुत ‘भिमा तुझ्या जन्मामुळे’ हे दोन अंकी तडाकेबंद महानाट्य सादर होणार आहे. प्रा. प्रकाश कुमार वाघमारे यांचे लेखन व दिग्दर्शन असलेली ही ‘एका क्रांतिसूर्याची धगधगती अंगारगाथा’ रसिकांसाठी मुख्य आकर्षण ठरणार आहे.
*नागठाणे: सुदर्शन शिंदे यांचे भव्य व्याख्यान*
दुसरीकडे, नागठाणे ग्रामपंचायत समोर मंगळवार, १४ एप्रिल रोजी सायंकाळी ६:०० वाजता महाराष्ट्राचे लोकप्रिय व्याख्याते मा. सुदर्शन (दादा) शिंदे यांचे ‘भव्य व्याख्यान’ आयोजित करण्यात आले आहे. भीम गर्जना युवक मित्र मंडळ, बौद्ध नागरी समिती (नागठाणे व मुंबई) आणि समस्त ग्रामस्थ नागठाणे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
*कार्यक्रमाचा तपशील एका दृष्टीक्षेपात:*
– *सकाळी ११:०० वाजता अंकलखोप येथील पवित्र भूमी अस्थी स्मारक येथे पुष्पार्पण व अभिवादन सोहळा*
– *सायंकाळी ७:०० वाजता अंकलखोप येथे ‘भिमा तुझ्या जन्मामुळे’ (महानाट्य)*
– *सायंकाळी ६:०० वाजता नागठाणे (ग्रामपंचायत समोर) येथे मा. सुदर्शन (दादा) शिंदे यांचे व्याख्यान*
या सर्व कार्यक्रमांचे नियोजन मा. प्रदीप (आप्पा) कदम यांच्या विशेष पुढाकाराने करण्यात आले असून, नागठाणे आणि अंकलखोप परिसरातील जास्तीत जास्त बंधू-भगिनींनी या वैचारिक आणि सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन *’भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, अंकलखोप’* आणि *’भीम गर्जना युवक मित्र मंडळ बौद्ध नागरी समिती, नागठाणे’* यांच्या वतीने करण्यात आले आहे.