
दर्पण न्यूज पलूस :- मोहिते वडगाव येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘यशवंत व्हॉलीबॉल चषक २०२६’ या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा जल्लोषात झाला. या स्पर्धेत कोरेगाव संघाने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर ‘यशवंत चषक’वर आपले नाव कोरून विजेतेपद पटकावले.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यांनंतर एकूण १६ यशस्वी संघांना सन्मानचिन्ह व रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील पहिले पाच क्रमांक खालीलप्रमाणे राहिले:
१. कोरेगाव संघ (प्रथम क्रमांक)
२. कुर्ली संघ (द्वितीय क्रमांक)
३. सोलापूर पोलीस (तृतीय क्रमांक)
४. बोरी संघ (चतुर्थ क्रमांक)
५. मामा कोरेगाव (पाचवा क्रमांक)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रदीप (आप्पा) कदम (अध्यक्ष, स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती) यांनी या स्पर्धेमागची भूमिका मांडली. ते म्हणाले, “ग्रामीण भागातील मातीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत, याच ध्येयाने आम्ही हा उपक्रम राबवला. मोहिते वडगावच्या ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने या स्पर्धेला आपले मानून सहकार्य केले, ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. ग्रामस्थांची एकजूट आणि शिस्त यामुळेच हे भव्य नियोजन यशस्वी होऊ शकले.” त्यांनी यावेळी मोहिते वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत उपस्थित खेळाडूंचे अभिनंदन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आ. इद्रीस (भाई) नायकवडी यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रदीप (आप्पा) कदम यांच्या कामाचा गौरव केला. ते म्हणाले, “राजकारणापलीकडे जाऊन समाजहिताचे आणि क्रीडा क्षेत्राला उभारी देणारे उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे. प्रदीप आप्पांनी अत्यंत कष्टाने आणि नियोजित पद्धतीने ही स्पर्धा भरवून तरुण पिढीसमोर एक आदर्श ठेवला आहे. अशा स्पर्धांमुळेच खेळाडूंची जिद्द वाढते.” त्यांनी यशस्वी संघांना शुभेच्छा देत मोहिते वडगावच्या क्रीडाप्रेमी प्रेक्षकांचेही विशेष आभार मानले.
मध्यरात्रीच्या पुढे उशिरापर्यंत ही स्पर्धा सुरू असूनही मैदानात क्रीडाप्रेमींची आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती. प्रत्येक गुणावर प्रेक्षकांचा होणारा जल्लोष खेळाडूंचा उत्साह वाढवत होता. या सोहळ्यासाठी पत्रकार बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी कृषिरत्न मा. प्रतापसिंह मोहिते-पाटील (महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष, मराठा सेवा संघ), मा. विजय मोहिते (माजी सरपंच, मोहिते वडगाव) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत माजी सरपंच विजय मोहिते यांनी केले, तर सूत्रसंचालन अभिजीत सावंत यांनी अत्यंत बहारदार पद्धतीने केले. आभार संजय शिंदे यांनी मानले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी भिकाजी परीट, सौमेद परीट, तुषार सूर्यवंशी, अभिजीत कौलगे, आशिष सूर्यवंशी, आमीर (भैय्या) पठाण, सागर मासाळ, हरीश वडार, सुशांत लाड, मिलिंद वानखेडे, ओमकार परबत, रोहित परबत, सचिन मासाळ, अभिजीत कदम, आदित्य धनवडे आणि भैरवनाथ स्पोर्ट्स क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.