

दर्पण न्यूज पलूस/दुधोंडी -:
स्थानिक पातळीवर विश्वासार्हता आणि प्रगतीचे प्रतीक ठरलेली मानसिंग को-ऑप बँक लि., दुधोंडीने 31 मार्च 2026 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत बँकिंग क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. सातत्यपूर्ण नियोजन, पारदर्शक कारभार आणि ग्राहकाभिमुख सेवा यामुळे बँकेने आर्थिकदृष्ट्या भक्कम प्रगती साधली असून यंदा बँकेला तब्बल 8 कोटी 39 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. ही माहिती बँकेचे संस्थापक श्री. जे. के. (बापू) जाधव यांनी दिली.
बँकेच्या वाढत्या विश्वासार्हतेचा प्रत्यय तिच्या आकडेवारीतून स्पष्ट दिसून येतो. सध्या बँकेकडे 6132 सभासद असून एकूण ठेवी 233 कोटी 59 लाख रुपयांवर पोहोचल्या आहेत. त्याचबरोबर 203 कोटी 42 लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असून बँकेचा एकूण व्यवसाय तब्बल 437 कोटी 1 लाख रुपयांपर्यंत गेला आहे. 65 कोटी 75 लाख रुपयांची गुंतवणूक, 13.14 टक्के सी.आर.ए.आर. आणि केवळ 4.46 टक्के इतकी नियंत्रित थकबाकी ही बँकेच्या सक्षम व्यवस्थापनाची साक्ष देणारी आहे.
बँकेचे भागभांडवल 5 कोटी 4 लाख रुपये असून राखीव व इतर निधी 39 कोटी 32 लाख रुपयांपर्यंत वाढला आहे. या भक्कम आर्थिक पायाभरणीमुळे बँक भविष्यातील विस्तारासाठी सज्ज असल्याचे चित्र स्पष्ट होते.
सेवेच्या दृष्टीनेही बँकेने मोठी झेप घेतली आहे. दुधोंडी, सांगली, पलूस, विटा आणि कराड या प्रमुख ठिकाणी बँकेच्या एकूण पाच शाखा कार्यरत असून मुख्य कार्यालयासह चार शाखा स्वतःच्या प्रशस्त इमारतीत सुरू आहेत. ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांना दर्जेदार आणि जलद सेवा देण्यावर बँकेचा भर आहे.
आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यातही बँक आघाडीवर आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची वीज बिल भरणा सेवा, पॅन कार्ड सुविधा, आधार पेमेंट प्रणालीद्वारे शासकीय अनुदान जमा होण्याची सुविधा यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. याशिवाय मोफत एसएमएस
सेवा, RTGS आणि NEFT द्वारे त्वरित निधी हस्तांतरण या सुविधा बँकेने प्रभावीपणे सुरू केल्या आहेत.
डिजिटल बँकिंगच्या युगात ग्राहकांच्या सोयीसाठी कोअर बँकिंग प्रणाली लागू करण्यात आली आहे. मुख्य शाखा दुधोंडी येथे एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन आणि पासबुक प्रिंटिंग मशीनची सुविधा उपलब्ध असून रुपे डेबिट कार्डद्वारे देशभरातील 2.5 लाखांहून अधिक एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा ग्राहकांना मिळत आहे. तसेच मोबाईल बँकिंग आणि यूपीआय सेवांमुळे ग्राहकांना घरबसल्या सहज आणि सुरक्षित व्यवहार करता येत आहेत.
ग्राहकांचा वाढता विश्वास, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सक्षम नेतृत्व यामुळे मानसिंग को-ऑप बँक भविष्यात आणखी मोठी झेप घेण्यास सज्ज असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीत बँकेचे योगदान लक्षणीय ठरत असून येत्या काळात बँक आणखी नवे विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
ही माहिती बँकेचे चेअरमन श्री. सुधीर (भैय्या) जाधव आणि व्हा. चेअरमन श्री. दौलतराव लोंखंडे यांनी दिली. बोर्ड ऑफ मनेजमेंट चेअरमन हणमंत कारंडे, जनरल मॅनेजर श्री. संभाजी जाधव यांनी दिली. याप्रसंगी बँकेचे सर्व संचालक, बोर्ड मॅनेजमेट सदस्य व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.