– जिल्हा क्रीडा संकुलमधील नूतनीकरण केलेल्या बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण
दर्पण न्यूज मिरज/सांगली : युवा खेळाडुंच्या भवितव्यासाठी जिल्ह्यात क्रीडापूरक वातावरण निर्माण करून आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बॅडमिंटन कोर्टाच्या नूतनीकरणातून नव्या खेळाडुंना अधिक संधी निर्माण होतील, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.
जिल्हा क्रीडा संकुल, सांगली येथील नूतनीकरण केलेल्या बॅडमिंटन हॉलच्या उद्घाटन व लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोविड -19 च्या महामारीच्या काळामध्ये बॅडमिंटन हॉलमध्ये वैद्यकीय उपचार केंद्र सुरू करण्यात आले होते. तत्कालिन परिस्थितीच्या गरजेनुरूप अंतर्गत बदल करण्यात आल्याने खेळासाठी हॉलचा वापर करता येत नव्हता. यासाठी राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून 1 कोटी 10 लाख रूपये निधीची तरतूद करण्यात येऊन हे नूतनीकरण केलेले कोर्ट खेळाडुंसाठी सज्ज झाले आहे, असे ते म्हणाले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, क्रीडा क्षेत्रातून युवा पिढीचा सर्वांगीण विकास होत असतो. ग्रामीण भागातील खेळाडुंमध्ये प्रचंड क्षमता असते. योग्य सुविधा आणि मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील खेळाडु राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात. त्यामुळे अशा खेळाडुंसाठी क्रीडा सुविधा देण्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद करू. जिल्हा क्रीडा संकुल येथील सिंथेटिंक ट्रॅक व फूटबॉल मैदानासाठी जवळपास 11 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या खेळाडुंचा राज्य शासनाच्या वतीने शासकीय नोकरीत समावेश केला जातो, असे सांगून त्यांनी आपण खेळाडुंना केलेल्या मदतीतून आंतरराष्ट्रीय खेळाडु घडल्याचे आवर्जून सांगितले.
कोविड -19 च्या महामारीच्या काळामध्ये अत्यावश्यक बाब म्हणून वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा क्रीडा संकुल, सांगली येथील बॅडमिंटन हॉल येथे वैद्यकीय उपचार केंद्र सुरू करण्यात आले होते. वैद्यकीय सुविधासाठी बॅडमिंटन हॉलमध्ये ऑक्सिजन बेड स्ट्रक्चरसाठी अंतर्गत बदल करण्यात आल्याने खेळासाठी हॉलचा वापर करता येवू शकत नव्हता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत खेळाडुंना पूर्वीप्रमाणे बॅडमिंटन हॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. हॉलमधील फरशांची कामे सिव्हील वर्क, वुडन फ्लोअरिंगचे काम, रंगरंगोटीची कामे, खेळाडुंसाठी मुलभूत सुविधा निर्माण करून हॉलचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यामुळे आगामी विविध शालेय क्रीडा स्पर्धा, नियमित बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेणे सोयीचे होणार आहे.