स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जनसुराज्य पक्षाकडून 14 डिसेंबरपासून मुलाखती : प्रदेशाध्यक्ष समित कदम
मिरज येथे जनसुराज्य पक्षाच्या बैठकीत निर्णय ; अनेकजण इच्छुक

दर्पण न्यूज मिरज प्रतिनिधी :-
आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या रविवार दि. 14 डिसेंबर पासून मुलाखती घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी दिली.
समित कदम यांच्या अध्यक्षतेखाली जनसुराज्य शक्ती पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी या निवडणुकांचे पक्ष निरीक्षक व हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे आमदार अशोकराव माने, माजी सभापती महादेव कुरणे, माजी नगरसेवक आनंदा देवमाने यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ही आपली भूमिका मांडली.
समित कदम म्हणाले, जनसुराज्य शक्ती पक्ष आगामी निवडणुकीमध्ये देखील भाजप सोबत असणाऱ्या महायुतीमध्येच असणार आहे. आगामी निवडणुकीसाठी आमची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे आमच्या पक्षांमध्ये इनकमिंग जोरदारपणे सुरू आहे. भाजपकडून जास्तीत जास्त उमेदवारी मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका, सांगली जिल्हा परिषद जिल्ह्यातील मिरजेसह जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून लढण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्या इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या उमेदवारी बाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या मुलाखतींची सुरुवात रविवारी 14 डिसेंबर पासून केली जाणार आहे.



