ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रसामाजिक

कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत राज्यात  १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासणी

दर्पण न्यूज मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात मागील पाच वर्षांप्रमाणे यंदाही कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये व्यापक सर्वेक्षणाद्वारे कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

यंदाच्या अभियानात ८.६६ कोटी लोकसंख्या आणि १ कोटी ७३ लाख २५ हजार घरे सर्वेक्षणासाठी निवडली असून, ६५,८३२ पथके आणि १३,१६६ पर्यवेक्षक या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक पथक दररोज २० घरे, तर शहरी भागात २५ ते ३० घरांना भेट देऊन प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करणार आहे. प्रत्येक पथकात एक आशा स्वयंसेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक सहभागी असून, ते सलग १४ दिवस सर्वेक्षण करतील.

कुष्ठरुग्ण शोध अभियानाच्या राज्यस्तरीय जनजागरण समितीची बैठक आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला आरोग्य सेवा सहसंचालक (क्षयरोग व कुष्ठरोग) डॉ. राजरत्न वाघमारे, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे सहायक संचालक डॉ. संजयकुमार जठार, दूरदर्शन प्रतिनिधी डॉ. आलोक खोब्रागडे, आकाशवाणी मुंबईचे राजेश शेजवले, अलर्ट इंडियाचे वरिष्ठ प्रोग्रामर विन्सेंट के. ए., ‘अपाल’चे अध्यक्ष माया रणवरे, महाराष्ट्र कुष्ठ पीडित संघटनेच्या सदस्या मदिना शेख, राज्य जागरण समिती सदस्य विकास सावंत या बैठकीला उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना तसेच जिल्ह्याधिकारी व गावांच्या सरपंचांना पत्र लिहून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियानात जास्तीत जास्त कुष्ठरुग्णांचे निदान निश्चितीसाठी सर्व यंत्रणांना मार्गदर्शन करुन आपल्या प्रभावी नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबिटकर यांनी पत्रात केले आहे. आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. निपुण विनायक यांनी या अभियानाचा सखोल आढावा घेत सर्व जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे हे अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले आहे. राज्यातील नागरिकांनाही सहकार्याचे आवाहन करण्यात आले असून, कुष्ठरोगावरील उपचार पूर्णपणे मोफत, प्रभावी आणि सर्व सरकारी आरोग्य यंत्रणेमार्फत सहज उपलब्ध असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून, कुष्ठरोग निदान झाल्यास त्यांना तत्काळ बहुविध औषधोपचार सुरू करण्यात येणार आहे. घरोघर तपासणी करून समाजातील, निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून उपचाराखाली आणणे व संसर्गाची साखळी खंडित करणे, कुष्ठरोगाबाबत समाजात जनजागृती वाढवणे, २०२७ पर्यंत ‘शून्य कुष्ठरोग प्रसार’ या ध्येयाच्या दिशेने वाटचाल मजबूत करणे, ही या अभियानाची उद्दिष्ट्ये आहेत. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर सर्वेक्षणाविषयी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली जात आहे. तसेच जिल्हा व तालुका स्तरावर समन्वय समित्या आणि प्रा.आ. केंद्रांवर पथक सदस्यांचे प्रशिक्षण सुद्धा सुरू आहे.

राज्यात कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने नुकतेच कुष्ठरोगाला ‘नोटिफायबल डिसीज’ म्हणून घोषित केले आहे.

यानुसार कुष्ठरोगाचे निदान झालेल्या सर्व रुग्णांची नोंद दोन आठवड्यांच्या आत संबंधित जिल्हा आरोग्य कार्यालय, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, कुष्ठरोग तसेच स्थानिक नागरी आरोग्य अधिकाऱ्यांकडे करणे आता सर्व डॉक्टर आणि आरोग्य संस्थांसाठी बंधनकारक आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!