भिलवडी, सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘सखी सावित्री समिती ’च्या विद्यार्थिनी सुरक्षितता, आरोग्य व आहार, मुलींचे व्यक्तिमत्व मार्गदर्शन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद



दर्पण न्यूज भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये 5 वी ते 10 वीतील विद्यार्थिनींसाठी विद्यार्थिनी सुरक्षितता, आरोग्य व आहार, तसेच मुलींचे व्यक्तिमत्व विकास या विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. आर. झेड. तांबोळी होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून भिलवडी येथील डॉ. सौ. भाग्यश्री कुलकर्णी व डॉ. सौ. सविता चव्हाण उपस्थित होत्या.
प्रमुख पाहुण्या डॉ. सौ. भाग्यश्री कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्व विकासावर प्रकाश टाकत समाजात वावरताना मुलींची चालढाल, वागणूक, बोलण्याची पद्धत (Communication Skills) कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले.
संत तुकारामांच्या अभंगातील —
“मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण
मोक्ष अथवा बंधन
सुख समाधान इच्छा ते”
— या ओळींचा आधार घेऊन सकारात्मक व्यक्तिमत्वाचे महत्त्व स्पष्ट केले.तसेच डॉ. सौ. सविता चव्हाण यांनी मुलींमध्ये वयात येताना होणारे Hormonal Changes, शारीरिक वाढ व शारीरिक बदल याबद्दल सविस्तर माहिती दिली. किशोरवयात आरोग्य आणि आहाराची योग्य काळजी घेणे किती आवश्यक आहे, याबाबत त्यांनी विद्यार्थिनींना जागरूक केले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. एस. एस. मोरे, उपमुख्याध्यापक श्री. व्ही. एस. तेली, पर्यवेक्षक श्री. व्ही. आर. सावंत, संस्थेचे सचिव श्री. एम. एस.हाके, सहसचिव के.डी. पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. शिक्षिका सौ. ए. व्ही. बंडगर यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. पी. व्ही. धेंडे यांनी केले, पाहुणे परिचय सौ. व्ही. आर. चौगुले व आभार प्रदर्शन सौ. जी. एम. गावित यांनी केले .
विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग आणि मार्गदर्शकांचे मोलाचे मार्गदर्शन यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला.


