कृषी व व्यापारग्रामीणमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

ऊस उत्पादनता वाढ अभियाना’चा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

1 जुलै रोजी जिल्ह्यात शुभारंभ, ए.आय. तंत्रज्ञानासह उत्पादनवाढीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

 

दर्पण न्यूज कोल्हापूर : जिल्ह्यात 1 जुलै रोजी कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या कृषी दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी विभागामार्फत महत्वाकांक्षी “हेक्टरी 125 मे. टन ऊस उत्पादनता वाढ अभियान” सुरु करण्यात येत आहे. या विशेष कार्यक्रमाचा शुभारंभ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते दि.1 जुलै रोजी सकाळी 10 वाजता नवीन सभागृह, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे होणार आहे. या अभियानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

कृषी दिनानिमित्त आयोजित या अभियानात शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादनवाढ, आणि ऊस शेतीविषयी सखोल प्रशिक्षण, मार्गदर्शन, तसेच एक्सपोझर व्हिसीटची संधी दिली जाणार आहे. याचबरोबर, ऊस उत्पादनात वाढ साधण्यासाठी ‘हेक्टरी 125 मे.टन ऊस उत्पादन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहनही पालकमंत्री आबिटकर यांनी केले आहे. हे अभियान शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारे आणि उत्पादनक्षमतेत वाढ करणारे ठरणार असून, कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

कृषी विभाग, प्रकल्प संचालक, आत्मा व कृषी विभाग, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी हरित क्रांतीला चालना देत राज्यात अनेक कृषी योजना राबविल्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र कृषी विकासाच्या मार्गावर पुढे गेला, या दिवसाचे औचित्य साधून, जिल्हास्तरावर पिक स्पर्धा विजेते, उत्कृष्ट शेतकरी तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच, ऊस पिकामध्ये ए.आय. (AI) तंत्रज्ञानाचा वापर, तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजना यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी सारिका वसगावकरयांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तंत्रज्ञान मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!