सांगली : बँकांनी पीक कर्ज व प्राथमिक क्षेत्राकरिता कर्ज वाटप गतीने करावे : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली : खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक साधनसामग्री वेळीच उपलब्ध होणे महत्वाचे असून यासाठी पतपुरवठा करणाऱ्या सर्व बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. याबरोबरच प्राथमिक क्षेत्राकरीता देण्यात आलेले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी गतीने पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.
जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रमुख राजीव कुमार सिंग, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, आरबीआयचे अग्रणी अधिकारी बिस्वजीत दास, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली विवेक कुंभार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे श्री. पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नंदिनी घाणेकर, माविम चे व्यवस्थापक कुंदन शिनगारे, बीओंआय आरसेटी चे संचालक महेश पाटील तसेच जिल्ह्यातील बँकांचे व्यवस्थापक व विविध महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पीक कर्ज वाटपाचा बँक निहाय आढावा घेतला. चालू वर्षाचे पीक कर्ज वाढवून उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांना पीक विमा व हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदण्याकरिता बँकांनी पीक विमा हप्ते विमा कंपनीकडे वेळेत वर्ग करावेत. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याकरिता बँका आणि विविध महामंडळानी परस्पर समन्वय ठेवून लाभार्थ्यांना लाभ द्यावा. कर्ज वाटपात अत्यल्प काम झालेल्या शासकीय विभाग, महामंडळे व बँकांना कामगिरी सुधारण्यासाठी संबंधितांना नोटीस बजवण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
कृषी पायाभूत विकास निधी (AIF व AHIDF), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME), पीएम विश्वकर्मा, पीएमइजीपी,एनएलएम, सीएमइजीपी, पीएम स्वनिधी व महामंडळाच्या योजनांचा लाभ देऊन नवनवीन व्यवसाय उभारणीस प्रोत्साहन देण्याबाबत बँकाना व सर्व शासकीय विभागांना जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या.
जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे प्रस्ताव बँकांनी वेळेत पाठवण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी जिल्हा वार्षिक पतपुरवठा सन २०२४-२५ अहवालाची माहिती दिली. त्यांनी वार्षिक पतपुरवठा आराखड्या अंतर्गत कृषी, सूक्ष्म, लघु व मध्यम क्षेत्राचे एकूण प्राथमिक क्षेत्राचे उद्दिष्ट ८ हजार ७९० कोटी व अप्राथमिक क्षेत्राकरिता ३ हजार ५०० कोटी असे एकूण उद्दिष्ट १२ हजार २९० कोटीचे ठेवल्याचे सांगितले. सन २०२४-२५ करिता गाई-म्हैशी व मासेमारी करिता कर्ज वाटपाचे आवाहन नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक निलेश चौधरी यांनी केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी PMFME व AIF योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन बँकांना केले. यावेळी उपस्थितांना उप आयुक्त पशुसंवर्धन विभाग डॉ. अजय थोरे यांनी NLM योजना व AHIDF योजने संदर्भात उपस्थितांना माहिती दिली.
बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, सांगली यांनी सन २०२४-२५ मधील प्रशिक्षणाचा आढावा दिला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी नवनवीन उपक्रमांचे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्याबाबत सूचना केल्या.
या बैठकीत वार्षिक पतपुरवठा आराखडा सन २०२४-२५ व आरसेटी च्या वार्षिक कार्यअहवालाचे चे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गत वर्षात CMEGP योजनेत चांगली कामगिरी केलेल्या बँकांना प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले. गत वर्षात महिला बचत गटांना उमेद अभियान, माविम व इतर वैयक्तिक लाभार्थ्यांना पीएमस्वनिधी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजना चांगल्याप्रकारे राबवल्याबद्दल संबंधित महामंडळ व सर्व बँकांच्या कामाचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कौतुक केले.
—–++++++++++++++++++++
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी
15 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सांगली : राज्यातील सर्व महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जमाती – क धनगर समाजाच्या विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 15 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली चे सहाय्यक संचालक अमित घवले यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि तालुका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जमाती – क धनगर समाजाच्या विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 43 हजार रूपये रक्कम लाभ म्हणून वित्तरीत केली जाणार आहे. पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी असणाऱ्या व योजनेच्या अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत. योजनेचे अर्ज व अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांचे कार्यालय सांगली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड, सांगली येथे संपर्क साधवा, असे आवाहनही श्री. घवले यांनी केले आहे.
————–++++++++
शासकीय वसतिगृहांसाठी इमारत भाडेतत्वावर देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सांगली : इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृहे सुरु करण्यात येणार आहेत. या वसतिगृहांसाठी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी इमारत भाडेतत्वावर देण्यासाठी इच्छुक मालकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली चे सहाय्यक संचालक अमित घवले यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी मुलींसाठी 100 विद्यार्थी क्षमतेचे एक वसतिगृह शासनाकडून सुरु करण्यात येणार आहे. ही वसतिगृहे सुरु करण्यासाठी प्रति वसतिगृह सुमारे 8 हजार ते 10 हजार चौ. फुट क्षेत्रफळ इमारत आवश्यक आहे. वसतिगृहासाठी भाड्याने घेण्यात येणाऱ्या इमारतीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणित केलेले भाडे दरमहा मंजूर केले जाणार आहे.
इच्छुक इमारत मालकांनी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी इमारत असल्यास शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाडेतत्वावर शासनास देण्याकामी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासन निर्णय दि. 13 मार्च 2023 मधील परिशिष्ट 2 व 3 मधील प्रपत्रात शासकीय वसतिगृहासाठीचा प्रस्ताव सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सांगली यांचे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, सांगली यांच्याकडे तात्काळ सादर करावा. अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सांगली या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. घवले यांनी केले आहे.
——————
पंडीत दीनदयाळ उपाध्यय स्वयंम योजनेच्या लाभासाठी तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन
: राज्यातील सर्व महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्धवारे प्रवेश घेतलेल्या पंस्तु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाळ उपाध्यय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली चे सहाय्यक संचालक अमित घवले यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना रक्कम 43 हजार रुपये रक्कम लाभ म्हणून वितरीत केली जाणार आहे. पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी असणाऱ्या व योजनेच्या अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकामी तात्काळ अर्ज सादर करावेत. या योजनेचे अर्ज व अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांचे कार्यालय सांगली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड, सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. घवले यांनी केले आहे