क्राईममहाराष्ट्र

करगणी येथे दूध भेसळ ; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

 

 

     दर्पण न्यूज  सांगली : आटपाडी तालुक्यातील करगणी येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने टाकलेल्या धाडीत दुधामध्ये भेसळ करण्याकरिता साठविलेली डेअरी परमिएट पावडर (25 कि. ग्रॅ. चे एक बॅग व 19 कि. ग्रॅ. खुली पावडर) आढळून आली. ही माहिती अशी माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

        या कारवाईत करगणी येथील सचिन वसंत सरगर यांच्या राहत्या घरी तपासणी केली असता तेथे दुधामध्ये भेसळ करण्याकरिता साठविलेली डेअरी परमिएट पावडर (25 कि. ग्रॅ. चे एक बॅग व 19 कि. ग्रॅ खुली पावडर) आढळून आली. सदर दूध व डेअरी परमिएट पावडर यांचे नमुने विश्लेषणाकरिता घेऊन उर्वरित 4 हजार 800 रूपये किंमतीचा 150 ‍लि. दुधाचा साठा जागीच नष्ट करण्यात आला व उर्वरित डेअरी परमिएट पावडरचा 6 हजार 364 रूपये किंमतीचा 43 कि. ग्रॅ. साठा जप्त करुन अन्न सुरक्षा अधिकारी यांनी ताब्यात घेतला. अन्न नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत पुढील कारवाई केली जाणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

        अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती एस. व्ही. हिरेमठ यांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

अन्न भेसळीबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, सांगली कार्यालयाशी 0233-2602202 या दूरध्वनी क्रमांक किंवा राज्यस्तरीय टोल फ्री क्र. 1800222365 वर संपर्क करुन माहिती द्यावी, असे पत्रकात म्हटले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!