सांगली जिल्ह्यात प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर टाळावा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली : राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये, यासाठी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत तरतूद केलेली आहे. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व आस्थापनांनी आवश्यक त्या उपाययोजना करून दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही यासाठी जनतेने देखील आवश्यक काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा. जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.