आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन,संशोधनाची आवड आवश्यक ; सचिव विरसिंह रणसिंग

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयामध्ये सायन्स फेस्ट (Science Fest) चे आयोजन

 

 

दर्पण न्यूज कळंब :-
कळंब ता. इंदापूर येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालयामध्ये सायन्स फेस्ट (Science Fest) चे आयोजन विज्ञान विभाग व बेस्ट प्रॅक्टिस कमिटी च्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
सायन्स फेस्ट चे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रमुख उपस्थिती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इंदापूर चे डॉ. राजेंद्र साळुंखे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती चे डॉ. विजय मोहिते व डॉ. विकास काकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. प्रशांत शिंदे, विज्ञान विभागप्रमुख डॉ. सुहास भैरट, समन्वयक प्रा. राजलक्ष्मी रणसिंग तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे कसे वळावे याबाबत मार्गदर्शन केले.महाविद्यालयाची स्थापना करण्याच्या पाठीमागचा उद्देश स्पष्ट केला.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, नव्या संशोधन कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, सैद्धांतिक ज्ञानास प्रत्यक्ष प्रयोगांची जोड देणे, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता,आत्मविश्वास आणि सादरीकरण कौशल्यांचा विकास करणे या उद्देशाने या महाविद्यालयामध्ये दोन वर्षीपासून सायन्स फेस्ट सुरु केले असल्याचे सांगितल. सायन्स फेस्ट मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणक विज्ञान व पर्यावरणशास्त्र या विषयांवरील मॉडेल्स व प्रकल्प सादर केले. नवीकरणीय ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण यांसारख्या विषयांवरील प्रकल्प विशेष लक्षवेधी ठरले.विद्यार्थ्यांनी थेट प्रयोग करून वैज्ञानिक संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. पोस्टर प्रदर्शन मध्ये विविध वैज्ञानिक विषयांवरील माहितीपूर्ण पोस्टर्स विद्यार्थ्यांनी सादर केले.सायन्स फेस्ट मधील प्रकल्पांचे मूल्यमापन डॉ. राजेंद्र साळुंखे, डॉ. विजय मोहिते, डॉ. विकास काकडे तज्ज्ञ परीक्षकांच्या समितीद्वारे करण्यात आले. प्रकल्पातील नाविन्य, उपयोगिता, सादरीकरण आणि वैज्ञानिक स्पष्टता या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले.समारोप प्रसंगी उत्कृष्ट प्रकल्प व पोस्टर सादरीकरण केलेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. उपक्रमामध्ये एकूण १०३ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपले वैज्ञानिक विचार आणि कल्पकता प्रभावीपणे सादर केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयी अधिक रुची निर्माण झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सर्व उपस्थितांचे आभार मानले व कौतुक केले.सायन्स फेस्ट साठी तालुक्यातील नंदिकेश्वर विद्यालय जंक्शन, कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय कुरवली, श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर, एन ई एस हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज निमसाखर, एल.जी बनसुडे विद्यालय पळसदेव, केतकेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज निमगाव केतकी आणि विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर इत्यादी विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकानी सहभाग घेतला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!