भिलवडी येथे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचे जल्लोषात स्वागत; देशमुख यांच्या व्यापाऱी, ग्रामस्थांना भेटी
भिलवडी येथील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

भिलवडी: महायुतीचे,भाजपाचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना पलूस तालुक्यातून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत असून, देशमुख यांनी वैयक्तिक भेटीगाठीसह प्रचारामध्ये गती घेतली आहे.
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी मतदारसंघांमध्ये प्रचाराची तोफ डागली असून, वैयक्तिक भेटीगाठीवर त्यांनी मोठा जोर दिल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या प्रचार फेरीमध्ये मोठ्या संख्येने मतदार सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे.
पलूस तालुक्यात देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर 2024 रोजी संग्राम देशमुख यांनी भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेमधील व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या.तसेच पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण मला बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन भिलवडीतील मतदार बंधू-भगिनींना केले.संग्राम देशमुख यांनी भिलवडी भोईगल्ली येथील मस्जिद व मरिआई मंदीराला भेट देऊन, या पवित्र स्थळी माथा टेकवून दर्शन घेतले.
तत्पूर्वी त्यांचे भिलवडी येथे फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून संग्राम देशमुख यांचे स्वागत करण्यात आले.
शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला वर्गाच्या चांगलीच पसंतीस उतरली असून,याचा फायदा संग्राम देशमुख यांना होणार असल्याचे बोलले जात आहे.भिलवडी येथील संग्राम देशमुख यांच्या भेटी दरम्यान भिलवडी, माळवाडी आणि परिसरातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.