केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने आयोजित आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा : रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे केंद्रीय संचार ब्युरो कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरील मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन

रत्नागिरी, :-
सरदार पटेल यांचे जीवन चरित्र सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे आणि अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून यासाठी खूप मदत होऊ शकेल, असे हे आगळे वेगळे प्रदर्शन आयोजित करणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरोचे कौतुक करावे लागेल असे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले.
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर आणि कोकण रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांच्या विभागस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे झाले यावेळी ते बोलत होते.
यावेळी पोलीस अधीक्षकांनी प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस 112 हेल्पलाइन तसेच जिल्हा निवडणूक कार्यालय यांच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉल्सना भेट दिली. हे प्रदर्शन 3 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
प्रदर्शनात विविध कलापथकांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम होतील तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरील माहिती मल्टीमीडिया माध्यमातून उपस्थितांना घेता येईल. VR गॉगल्स, प्रश्नमंजुषा आणि 360 डिग्री सेल्फी बुथ यावेळी प्रवाशांसाठी आकर्षणाचा विषय ठरतील.
देशाच्या एकीकरणाचे शिल्पकार असलेल्या सरदार पटेल यांच्या जीवनाची सर्वसामान्यांना दुर्मिळ छायाचित्रांच्या माध्यमातून माहिती घेता यावी या उद्देशाने हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
नागरिक, इतिहास अभ्यासक, संशोधक, स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी आणि इतर विद्यार्थ्यांनी या विभागस्तरीय छायाचित्र प्रदर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी महेश चोपडे यांनी केले आहे.