महाराष्ट्र

सैनिकांच्या कुटुंबियांच्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य :  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ  

 

 

सांगली, सैनिक कुटुंबियांपासून दूर राहून सीमेवर देशाचे संरक्षण करतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य असेल. प्रशासन सदैव सैनिकांच्या पाठिशी राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे केले.

सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे उपाध्यक्ष ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालावडकर (निवृत्त), शौर्यचक्रप्राप्त विंग कमांडर प्रकाश नवले (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त)आदि उपस्थित होते.

शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित असलेल्या जिल्हा सैनिक कार्यालयाच्या भिंतींवर कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून विविध चित्रे चित्रीत करून या कार्यालयाबद्दल उत्सुकता निर्माण करावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सध्या जिल्ह्यातील 7 हजारहून अधिक व्यक्ती सैन्य दलात विविध पदांवर काम करत आहेत. माजी सैनिकांसह ही संख्या 25 हजाराच्या आसपास आहे. आजी माजी सैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, माजी सैनिक संघटना व अन्य संबंधित संघटनांनी सहकार्य करावे. माजी सैनिकांनी सैन्यदलात कार्यरत सैनिकांच्या कुटुंबाला सामाजिक सहाय्य करावे. मिरज आणि सांगलीच्या शासकीय रूग्णालयात अद्ययावत सुविधा दिल्या असून, सैनिकांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी व आपले आरोग्य वेळोवेळी जपावे, असे ते म्हणाले.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी सैनिकांचे समर्पण, त्याग, बलिदान यांच्याप्रती आपण नेहमीच कृतज्ञ राहायला हवे. त्यामुळे ध्वजदिन निधीसाठी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन केले.

यावेळी उत्कृष्ट ध्वजनिधी संकलन केलेल्या कार्यालयप्रमुखांचा सत्कार करण्यात आला. तसेच, शौर्यपदकधारक तसेच वीर माता, वीर पिता आणि वीर नारी यांना विशेष गौरव पुरस्कार वितरण करण्यात आले. विशेष गौरव पुरस्कारप्राप्त माजी सैनिक पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सैनिक संकुलात अभ्यासिका व भोजन कक्षात विविध सुविधा पुरविल्याबद्दल वसंत कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभी अमर जवान प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून वीरगती प्राप्त जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शासकीय अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!