प्रशासन प्रमुख साधणार मतदारांशी संवाद सहभाग नोंदविण्याचे नागरिकांना आवाहन
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
सांगली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी एकाच वेळी मतदार जनजागृती अंतर्गत 50 टक्केपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांच्या क्षेत्रामध्ये मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी संवाद यात्रेचे आयोजन करण्यास आले आहे. या संवाद यात्रे दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे मतदारांशी मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी संवाद यात्रा व गृहभेटी कार्यक्रमास प्रतिसाद द्यावा व मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदारांशी मतदान जनजागृती संदर्भात संवाद साधणार आहेत. जिल्हाधिकारी सांगली शहरातील संजयनगर परिसरामध्ये लव्हली सर्कल ते बिरनाळे चौक ते संजयनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, सांगली येथे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कडेगाव नगरपंचायत पटांगण येथे व पोलीस अधिक्षक विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते भाजी मंडई परिसरामध्ये मतदारांशी मतदान जनजागृती संदर्भात संवाद साधणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.