शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल
आय.पी.एस.अधिकारी यांची भूमिका साकारणार ; छत्रपती शिवाजी महाराज यांचा शुभाशीर्वाद घेऊन कामास सुरुवात

मुंबई : शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर यांनी भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवले. खेळाचे क्षेत्र पादाक्रांत करून आता त्यांनी कलाक्षेत्रात म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले आहे. कलाक्षेत्र गाजवण्याचा त्यांचा मानस आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली. कोणतेही शुभ काम करताना आपण आपल्या आराध्य देवतेचे आशीर्वाद घेतो. छत्रपती शिवराय हे श्री. सुहास खामकर यांचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे त्यांनी भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराला भेट दिली. छत्रपतींचे शुभाशीर्वाद घेऊन आपल्या कामास सुरुवात केली. या हिंदी चित्रपटात श्री. सुहास खामकर यांची आय.पी.एस. पोलीस अधिकारी अशी भूमिका आहे. ड्रग्स तस्करीच्या विरोधात परदेशात जाऊन ते लढा देतात असे सर्वसाधारण कथानक या चित्रपटाचे आहे. हे चित्रीकरण या मंदिराच्या परिसरात करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक श्री साकार प्रकाश राऊत, निर्माते श्री. पंकज प्रभाकर राऊत तसेच शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. राजू भाऊ चौधरी, श्री. कैलास महाराज नीचिते, श्री. श्रीकांत गायकर उपस्थित होते. यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि सदस्य यांच्या वतीने शरीरसौष्ठवपटू श्री. सुहास खामकर, दिग्दर्शक, निर्माते यांचे स्वागत करण्यात आले. तसेच या मंदिराची माहिती देण्यात आली. अतिशय उत्साहात हे चित्रीकरण पार पडले.