पलूसमध्ये मतदार जागृती अभियानांतर्गत मॅरेथॉन रॅली संपन्न
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. मतदान म्हणजे लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी प्रशासन पातळीवर जोरदार प्रबोधन मोहीम राबवली जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज पलूस शहरात तालुका प्रशासनाच्या वतीने पलूस तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन ते नवीन एसटी स्टँडपर्यंत मॅरेथॉन रॅली काढण्यात आली.
या मॅरेथॉन रॅलीची सुरुवात तहसील कार्यालयापासून झाली. प्रारंभी तहसीलदार दीप्ती रेटे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.
यावेळी बोलताना सहा. नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे म्हणाले, स्वीप कार्यक्रमांतर्गत युवक, युवती, प्रौढ, वृद्ध तसेच जे नव मतदार आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदानासंदर्भात गेली दोन महिने जागृती करण्याचे प्रयत्न करीत आहोत. तसेच शाळा, महाविद्यालयातून या संदर्भात रांगोळी / निबंध स्पर्धा, विद्यार्थी रॅली, सायकल रॅली असे उपक्रम घेतले आहेत. या सर्व बाबींचा मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निश्चित फायदा होईल.
यावेळी मतदार जागृतीच्या अनुषंगाने उपस्थितांनी मॅरेथॉन रॅलीमध्ये, सर्व कर्मचाऱ्यांनी हातात बॅनर घेवून तसेच मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. आपले मतदान आपले भविष्य अशा घोषणा दिल्या.
या रॅलीमध्ये तहसीलदार दीप्ती रिठे, निवडणूक नायब तहसीलदार सर्वश्री परदेशी, मनोहर पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप पाटील, गटशिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे, केंद्रप्रमुख सर्वश्री किरण आमणे, राम चव्हाण, शिक्षक मारुती शिरतोडे, नितीन चव्हाण, पंडित विष्णू दिगंबर हायस्कूलचे मुख्याध्यापक तानाजी करांडे, बाळासाहेब खेडकर, विनोद आल्हाट, संतोष खेडकर, अमोल कोळेकर यांच्यासह तहसील कार्यालय पंचायत समिती कर्मचारी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.