


सांगली : केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अंतर्गत कुपवाड शहरासाठी महत्वाच्या असणाऱ्या कुपवाड भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात दूरदृष्य प्रणालीव्दारे करण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्यासह लोकप्रतिनिधी, मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रसारण कुपवाड येथे करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील, वैभव साबळे व पंडित पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, माजी महापौर संगीता खोत, माजी उपमहापौर शेखर इनामदार, प्रकाश ढंग, प्रा. मोहन व्हनखंडे, माजी सभापती धीरज सुर्यवंशी, गीतांजली ढोपे पाटील, माजी नगरसेवक विष्णू माने, सोनाली सागरे, राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर, सविता मदने, वहिदा नाईकवडी यांच्यासह मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात कुपवाड भुयारी गटार योजनेबाबत सविस्तर माहिती देताना आयुक्त सुनील पवार म्हणाले, केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अंतर्गत कुपवाड भुयारी गटार योजनेचा प्रस्तावित खर्च 253 कोटी 41 लाख रूपये असून या योजनेचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. ही योजना दोन वर्षात पूर्ण होईल. मुख्य वाहिनी व उपनलिकाची एकूण लांबी 270 कि.मी. आहे. कुंभार मळा येथे 2.9 एकर जागेमध्ये 27 एम.एल.डी. क्षमतेचे एसबीआर पध्दतीचे मलशुध्दीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. अहिल्यानगर, तुळजाईनगर, कुंभार मळा एसटीपी जवळ, जागृती शिक्षण संस्थेजवळ पंपींग स्टेशन असणार आहे. सर्व पंपिंग स्टेशनच्या वीज जोडणीसाठी तरतूद आहे. सांगली व मिरज भुयारी गटार योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या उर्वरित भागासाठी ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याची तरतूद आहे. कुपवाड, वान्लेसवाडी व गर्व्हमेंट कॉलनी भागामध्ये भुयारी गटार योजना नसल्यामुळे सांडपाणी निचऱ्याचा प्रश्न निर्माण होता. या योजनेमुळे कुपवाड शहर अहिल्यानगर, तुळजाईनगर, शालिनीनगर, शामनगर, वान्लेसवाडी, गर्व्हमेंट कॉलनी, हसनी आश्रम, विजयनगर या भागाचा सांडपाणी निचऱ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. या योजनेचे काम दर्जेदार करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.