कोल्हापूरातील शहाजी महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता ग्रंथाचे प्रकाशन संपन्न

कोल्हापूरः अनिल पाटील
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण, उद्योग, धार्मिक क्षेत्रात व इतर सर्व क्षेत्रांमध्ये दूरदृष्टीने काम केले. त्यांचे विचाराने केंद्र आणि राज्य सरकारने कृती करावी अशी अपेक्षा कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी आज व्यक्त केली.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने संपादित केलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. राजीवजी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन राहुल पाटील, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
खासदार श्री शाहू महाराज म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुत हा ग्रंथ दिशादर्शक असून नव्या पिढीला शाहू महाराज समजून घेताना हा ग्रंथ उपयोगी ठरेल. शाहूनी स्थापन केलेल्या या शिक्षण संस्थेतील शहाजी महाविद्यालयाने राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त राबवलेल्या विविध उपक्रमातून शाहूंचे विचार विद्यार्थ्यांच्या पर्यंत, समाजापर्यंत पोहोचण्यास अधिक मदत झालेली आहे.
उच्च शिक्षण विभाग कोल्हापूरचे सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात शाहू महाराजांच्या विचाराची प्रेरणा होती. महाराजांनी विद्यार्थ्यांना त्यावेळी उपस्थित भत्ता सुरू केला होता. शिक्षणाबाबतचा त्यांचा तो दूरदृष्टीपणा होता. या ग्रंथाच्या माध्यमातून शाहू महाराजांचे विचार समाजापुढे जाण्यास मदत होणार आहे. महाविद्यालयाचे याबद्दल अभिनंदन.
राहुल पी. पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता यासारख्या ग्रंथाचे प्रकाशन कोल्हापुरात पहिल्यांदाच होत आहे. माझे आजोबा स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादा आणि वडील स्वर्गीय पी. एन. पाटील साहेब यांनी शाहू महाराजांचा विचार कृतीतून पुढे नेला. त्याच विचारातून मी व शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे हे वाटचाल करीत आहोत.
स्वागत व प्रस्ताविकामध्ये प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी ग्रंथ निर्मिती पाठीमागची भूमिका विषद केली. तसेच महाविद्यालयात राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. ते म्हणाले वर्गातील शिक्षणाबरोबरच मूल्य शिक्षणाचा विचार विविध उपक्रमातून रुजवण्याची गरज आहे.
याप्रसंगी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता या ग्रंथाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी या ग्रंथातील महत्त्वाच्या योगदानाबद्दल डॉ. डी. एल.काशीद-पाटील, डॉ. विजय देठे, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, प्रकाशक अनिल म्हमाने, डॉ. पी. बी. पाटील यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. पी. के. पाटील यांनी केले. निर्मिती प्रकाशनचे प्रमुख अनिल म्हमाने यांनी ग्रंथाचे मौलिकत्व विशद करून आभार मानले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. जे. के. पवार, प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी, विविध शाखांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
महाविद्यालयाने राबवलेल्या विविध उपक्रमांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आणि शाहू महाराजांच्यावरील ग्रंथांचे ग्रंथ प्रदर्शन शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने यावेळी संपन्न झाले. खासदार शाहू छत्रपती महाराज, शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.