दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार): —फेब्रुवारी व एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व पाचवी शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेत विटा येथील भारतमाता ज्ञानपीठच्या सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. तब्बल १३ विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत प्रशालेच्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली.
इयत्ता चौथीच्या परीक्षेत स्पंदन किसन मेटकरी याने २५८ गुण मिळवत सांगली जिल्ह्यात १९वा क्रमांक पटकावला. गौरवी बब्रुवान शिंदे व गायत्री संदीप भंडारे यांनी प्रत्येकी २५२ गुण मिळवत जिल्ह्यात २५वा क्रमांक मिळविला. ओवी रणजीत तारळेकर हिने २४६ गुणांसह ५३वा, संस्कृती संतोष ढवळे हिने २४० गुणांसह ९१वा, हर्षदा राजू गारोळे हिने २३२ गुणांसह १३२वा, तर राजवीर राजेश जाधव याने २३० गुणांसह १४६वा क्रमांक मिळविला.
इयत्ता पाचवीमध्ये आर्या किसनदेव यमगर हिने २७२ गुण मिळवत राज्यात १५वा क्रमांक पटकावून विशेष यश संपादन केले. आराध्या प्रसाद कलढोणे हिने २६० गुणांसह जिल्ह्यात २१वा, सम्रिती संजय गायकवाड हिने २२६ गुणांसह ५२वा, श्रेया संदीप जाधव हिने २३४ गुणांसह ५८वा, साईराज अभिजीत गायकवाड याने २३० गुणांसह ७१वा, तर वैष्णवी अशोक डोईफोडे हिने २१४ गुणांसह जिल्ह्यात १४२वा क्रमांक मिळविला.
स्पर्धा परीक्षा आणि सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशालेची चमकदार कामगिरी हे गेल्या काही वर्षांपासूनचे समीकरण बनले आहे. दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रशालेचे विद्यार्थी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेतील या यशामुळे प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे संस्थापक व सुप्रसिद्ध साहित्यिक रघुराज मेटकरी, अध्यक्षा रेखा शेंडगे, प्राचार्या वैशाली कोळेकर आणि कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांनी गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना रेखा शेंडगे, चंदना तामखडे व अमृता करडे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट समोर ठेवून गेल्या २५ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेली भारतमाता ज्ञानपीठची विजयमाला पतंगराव कदम प्रशाला विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांसाठी ओळखली जाते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन देणे, त्यांची नियोजनबद्ध तयारी करून घेणे आणि गुणवत्तेला चालना देणे यावर प्रशालेकडून सातत्याने भर दिला जात आहे. त्यामुळे प्रशालेचे विद्यार्थी शिक्षणासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
