दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी ( शिराज शिकलगार):–आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, विटा यांनी उद्योगाभिमुख शिक्षण, कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे.
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि उद्योग-शिक्षण क्षेत्रातील प्रभावी समन्वयामुळे अंतिम वर्षातील (बॅच २०२५-२६) ६ विद्यार्थ्यांची देशातील अग्रगण्य औषधनिर्मिती कंपनी ‘सिप्ला लिमिटेड’मध्ये निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांची निवड उत्पादन , गुणवत्ता नियंत्रण , गुणवत्ता हमी , देखभाल आणि उत्पादन प्रक्रिया यांसारख्या महत्त्वपूर्ण औद्योगिक विभागांसाठी करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार दिलेले तांत्रिक प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, मॉक इंटरव्ह्यू, अप्टिट्यूड ट्रेनिंग आणि उद्योगाभिमुख मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करता आली असून ते भरती प्रक्रियेत यशस्वी ठरले आहेत अशी माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे केंद्रीय प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. स्वप्नील जाधव यांनी दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील म्हणाले महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध उद्योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन, रोजगाराभिमुख प्रशिक्षण, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव, कौशल्य विकास कार्यशाळा आणि कॅम्पस प्लेसमेंट उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून ते उद्योग क्षेत्रासाठी सक्षम आणि स्पर्धात्मक बनले आहेत.
या यशाबद्दल निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अध्यक्ष आ. वैभवदादा पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक मा. पी. टी. पाटील, वित्त संचालक मा. रविराज सूर्यवंशी, संचालिका मा. पूजा पाटील, संस्थेचे सर्व संचालक व विश्वस्त, प्राचार्य, सर्व शैक्षणिक अधिष्ठाते, केंद्रीय प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या उल्लेखनीय यशामुळे आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, विटा यांची गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण, उद्योग-केंद्रित प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणारी संस्था म्हणून असलेली ओळख अधिक दृढ झाली आहे. भविष्यातही अशाच प्रकारे राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत राहणार असल्याचा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला.
