दर्पण न्यूज शिरसगांव-सोनसळ विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- आषाढी एकादशीनिमित्त शिरसगांव-सोनसळ येथील डॉ. पतंगराव श्रीपतराव कदम विद्यालयाच्या वतीने काल भक्तीमय वातावरणात दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी शाळेपासून दिंडीला प्रारंभ झाला. विद्यार्थी, शिक्षक व मोठ्या संख्येने उपस्थित पालकांनी हातात भगव्या पताका, मुखात “जय हरी विठ्ठल” चा गजर करत संपूर्ण गावातून फेरी काढली. टाळ-मृदुंगाच्या तालावर लहान मुलेही तल्लीन झाली होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत फुगडी, भारुड सादर केले. विशेषतः मुलींनी “नागिन सॉंग” च्या तालावर केलेली फुगडी ही कार्यक्रमाची मुख्य आकर्षण ठरली. पालकांनीही मुलांसोबत सहभाग घेत दिंडीला वेगळीच शोभा आणली.
सांगता प्रसंगी शाळेत महाआरती, प्रसाद वाटप व आभार प्रदर्शन झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री. अदाटे सर व सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.
