

दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) -: आषाढी एकादशी हा अवघ्या महाराष्ट्राचा सण त्या निमित्ताने विटा हायस्कूल व सं. भ. पवार ज्यूनि. कॉलेज, विटा येथे शुक्रवार, दिनांक 24 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशीची वारी व वृक्ष दिंडी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात सर्वप्रथम विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असलेल्या पालखीचे विद्यालयाचे प्राचार्य श्री. एच. एस. जाधव सर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य श्री. जाधव एच. एस. सर, वनविभागाचे अधिकारी श्री. ठोंबरे सर, विट्यातील ज्येष्ठ पत्रकार सिराज भाई शिकलगार, विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विठ्ठल रुक्मिणी च्या वेशभूषेत आलेले विद्यार्थी, संतांच्या वेशभूषेत आलेले विद्यार्थी, वारकरी वेशभूषा करून जमलेले विद्यार्थी, नऊवारी साडी नेसून डोक्यावर तुळस घेतलेल्या मुली या सगळ्यामुळे जणू पंढरपूरची वारी विटा स्कूलमध्ये अवतरली होती. विटा हायस्कूलचे वातावरण पूर्ण भक्तीमय झाले होते.
वृक्षदिंडी साठी अनेक मुलांनी झाड, फुल यांची अतिशय सुंदर व आकर्षक वेशभूषा केली होती. अशा या प्रसन्न, भक्तिमय वातावरणात आणि सजलेल्या विद्यार्थ्यांसमवेत,ढोल ताशांच्या गजरात, अभंगाच्या नादात, झाडे लावा प्रदूषण टाळा अशा घोषवाक्यांचे फलक घेऊन विटा शहरातून सुंदर अशी वारी व वृक्षदिंडी निघाली. त्याचबरोबर शाळेत अतिशय सुंदर रिंगण सोहळा सादर करण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी नृत्य, फुगड्या सादर केले.
झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषवाक्याने तसेच जय जय राम कृष्ण हरी च्या नादाने विटा नगरी दुमदुमून निघाली. शेवटी मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री. जाधव सर यांनी केले. सूत्रसंचालन विद्यालयातील उपशिक्षक सौ. बाळीकाई मॅडम यांनी केले. व आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. काळे सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी कण्यासात विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. एच. एस. जाधव सर, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. काळे सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. माने सर, वनविभागाचे अधिकारी श्री. ठोंबरे सर व विट्यातील जेष्ठ पत्रकार सिराज भाई शिकलगार हे उपस्थित होते.
