

दर्पण न्यूज पलूस प्रतिनिधी (अभिजीत रांजणे): महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह अंतर्गत पलूस तालुक्यातील बुर्ली येथील विठ्ठल मंदिरात महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ‘अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार’ प्रदान करून गौरव करण्यात आला.
सांगली येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती इनुजा शेख यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम यांच्या पुढाकारातून स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहात विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून हा महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिजामाता कृषी भूषण पुरस्कार प्राप्त पुष्पावती मिठारी, सौ. जयश्री रामचंद्र पाटील (बुर्ली), सौ. दीपाली बाबासाहेब पवार (कुंडल), सौ. सविता संदीप सूर्यवंशी (अंकलखोप), अश्विनी योगेश राडे (सावंतपूर) आणि साधना रमेश बनकर (पलूस) या कर्तृत्ववान महिलांचा ‘अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रोजगार मेळावे, जागतिक कौशल्य स्पर्धा, विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम तसेच महिला उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या, “आजची महिला केवळ चूल आणि मूल यापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती स्वतःच्या कर्तृत्वावर उभी राहत कुटुंबासह समाजालाही दिशा देत आहे. महिलांनी आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग आणि व्यवस्थापनाची कौशल्ये आत्मसात करून शासकीय प्रशिक्षण व कर्ज योजनांचा लाभ घेत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे. प्रत्येक महिलेमध्ये एक यशस्वी उद्योजक दडलेला आहे. गरज आहे ती स्वतःच्या कौशल्याची ओळख करून योग्य संधीचा लाभ घेण्याची.”
कार्यक्रमात बोलताना प्रदीपआप्पा कदम म्हणाले, “महिला सशक्तीकरण हा स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा महत्त्वाचा विचार होता. महिलांनी स्वावलंबी व्हावे, विविध क्षेत्रांत पुढे यावे यासाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या. आज त्या योजनांचा लाभ घेत अनेक महिला सक्षमपणे उभ्या राहत आहेत. कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे हा आमचा प्रयत्न आहे. महिला सक्षम झाल्या तर कुटुंब सक्षम होते आणि कुटुंब सक्षम झाले तर समाज व राष्ट्र अधिक सक्षम बनते.”
पुरस्कारप्राप्त महिलांनीही आपल्या मनोगतात यशाचा प्रवास, उद्योग-व्यवसाय उभारताना आलेल्या अडचणी आणि त्यांवर मात करत यश संपादन करण्याचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम, ॲड. संतोष जाधव, राहुल पाटील, तुकाराम धायुगडे, अमीर भैय्या पठाण, रणजीत शिंदे, अभिजित कौलगे, राजाराम कांबळे, बी. डी. मिठारी, भालचंद्र पाटील, सुनिल कुंभार यांच्यासह महिला, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
